सक्ती नव्हे तर स्वयंस्फूर्तीने विवरण देण्याचे उत्पादन शुल्क विभागाचे आवाहन

एक टक्का उत्पादन शुल्कविरोधात सराफांचा गेल्या १४ दिवसांपासून देशव्यापी बंद सुरू असतानाच सक्तीने कर वसुली केली जाणार नाही, अशी ग्वाही उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे. एवढेच नव्हे तर दागिने उत्पादकांची दालने तसेच कारखान्यांमध्ये विभागाच्या पर्यवेक्षकांना पाठविण्याऐवजी सराफ देतील त्या माहितीच्या आधारावर कराकरिता मूल्यांनकन केले जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आलेल्या तयार दागिन्यांवरील एक टक्का उत्पादन शुल्काविरोधात सुरू असलेल्या सराफांच्या देशव्यापी बंदचा मंगळवारी १४ वा दिवस होता. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी हा कर मागे घेण्यास नकार दिला आहे. तसेच उत्पादन शुल्क विभागानेही हीच भूमिका घेतली आहे.

मात्र सराफांचे असलेले अन्य आक्षेप दूर सारण्यात आल्याचा दावा उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई परिमंडळाचे (एक) मुख्य आयुक्त एस. सी. वार्शनेय यांनी केला. याअंतर्गत दोन दिवसांत ऑनलाइन नोंदणी करणे, देयके इलेक्ट्रॉनिक यंत्रणेने भरणे तसेच परतावाही माहिती तंत्रज्ञान प्रणालीने देणे आदी उपाययोजना अमलात येत असल्याचे ते म्हणाले. एक टक्का उत्पादन कराची मात्र १ मार्चपासूनच लागू झाली आहे.

या कर वसुलीसाठी सराफांकडे विभागाचे पर्यवेक्षक (इन्स्पेक्टर) जाणार नाहीत, असे स्पष्ट करतानाच वार्शनेय यांनी व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने त्यांच्या व्यवसायाची माहिती देण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर मौल्यवान धातूंच्या साठय़ांकरिता असलेल्या माहितीचे बंधनही काढून टाकण्यात आल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले.

आंदोलनावर ठाम

एक टक्का उत्पादन शुल्क मागे घेण्यास नकार देणाऱ्या सरकारविरोधातील सराफांचे आंदोलन कायम राहणार असल्याचे मंगळवारी स्पष्ट करण्यात आले. १ मार्चपासून उत्पादन शुल्क वसुलीसाठी विभाग प्रयत्नशील असतानाच गुरुवारी नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर ‘महारॅली’ आयोजित केल्याचे ‘ऑल इंडिया जेम्स अ‍ॅन्ड ज्वेलरी ट्रेड फेडरेशन’ (जीजेएफ) या प्रमुख आंदोलक संघटनेचे अध्यक्ष जी. व्ही. श्रीधर यांनी सांगितले.

दोन लाखांहून अधिक व्यापारी या निदर्शनात सहभागी होतील, असेही नमूद करण्यात आले. सराफांचे आंदोलन केवळ उत्पादन शुल्काविरोधातच नाही तर जानेवारीपासून लागू करण्यात आलेल्या पॅन सक्तीविरुद्धही असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उत्पादन कर संकलनाचे उद्दिष्ट उंचावले!

तयार दागिन्यांवरील एक टक्का उत्पादन शुल्कामुळे मुंबई विभागाचे चालू आर्थिक वर्षांतील कर संकलनाचे उद्दिष्टही उंचावले आहे. १ मार्चपासून लागू होत असलेल्या मौल्यवान धातूवरील व नियमित कर संकलनाने एकाच महिन्यात ५,६०० कोटी रुपयांची भर पडण्याची आशा व्यक्त केली गेली आहे. याबाबत उत्पादन शुल्क, ठाणे परिमंडळाच्या आयुक्त सीमा बिस्त यांनी सांगितले की, विभागाने (मुंबई) चालू आर्थिक वर्षांसाठी ४९,६०० कोटी रुपयांचे उत्पादन कर संकलनाचे ध्येय राखले आहे. पैकी सध्या ४४,००० कोटी रु. जमा झाले आहेत. वार्षिक तुलनेत यंदा १५ टक्क्यांहून अधिक कर संकलन शक्य आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पेट्रोलियम पदार्थ, मौल्यवान धातू तसेच सिगारेटवर यंदाच्या अर्थसंकल्पात सुचविण्यात आलेल्या उत्पादन शुल्कामुळे यंदा संकलन अधिक होण्याबाबतची आशा त्यांनी व्यक्त केली.