गेल्या आर्थिक वर्षांत ४४,९६८.९६ कोटी रुपयांचा व्यवसाय नोंदविणाऱ्या सहकार क्षेत्रातील आघाडीच्या सारस्वत बँकेने चालू आर्थिक वर्षांसाठी १,५०,००० कोटी रुपयांचे लक्ष्य राखले आहे. बँकेने गेल्या आर्थिक वर्षांसाठी भागधारकांना ५ टक्के अधिक, १५ टक्के लाभांश देऊ केला आहे.
बँकेच्या दादर (मुंबई) येथे झालेल्या ९७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सारस्वत बँकेचे अध्यक्ष शशिकांत साखळकर यांनी ही माहिती दिली. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष गौतम ठाकूर, कार्यकारी संचालक समीरकुमार बॅनर्जी आदी उपस्थित होते. विविध सहा राज्यात २६७ शाखा असलेल्या सारस्वत बँकेला आणखी २० शाखा सुरू करण्यास परवानगी मिळाल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
मार्च २०१५ अखेरीस सारस्वत बँकेचा व्यवसाय १४.११ टक्क्य़ांनी वाढून ४४,९६८.९६ कोटी रुपये झाला आहे. बँकेच्या ठेवींचे प्रमाण १३.५० टक्क्य़ांनी वाढून २७,१७०.८४ कोटी रुपयांवर गेले आहे. बँकेच्या कर्जाचे प्रमाण १५.०५ टक्क्य़ांनी वाढून १७,७९८.१२ कोटी रुपयांवर गेले आहे.
बँकेच्या चालू व बचत खात्यातील ठेवी ७१६.९२ कोटी रुपये झाले असून ते ठेवींशी प्रमाण २४.७३ टक्के आहे. बँकेच्या निव्वळ नफ्यात २९.२९ टक्क्य़ांची भर पडली आहे. तो गेल्या वर्षीच्या १४७.०९ कोटी रुपयांवरून यंदा १९०.१८ कोटी रुपयांवर गेला आहे.
बँकेच्या ढोबळ अनुत्पादित कर्जाचे प्रमाण गेल्या वर्षांच्या ४.६९ टक्क्य़ांवरून काहीसे सावरून ४.०२ टक्क्य़ांवर आले आहे. तर निव्वळ अनुत्पादित कर्जाचे प्रमाण हे ०.६७ टक्के राहिले आहे. अनुत्पादित कर्जाचा तोटा भरून काढण्यासाठी बँकेने केलेल्या तरतुदीचे प्रमाण ८३.९४ टक्के आहे. बँकेचे भांडवल पर्याप्तता प्रमाण (सीएआर) १२.११ टक्क्य़ांवरून १२.५७ टक्क्य़ांवर गेले आहे.