जे. कुमार, प्रकाश इंडस्ट्रीजवरील व्यवहारबंदी आदेशाला स्थगिती

संशयित ‘शेल कंपन्या’ म्हणून वर्गीकरण केल्या गेलेल्या जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स आणि प्रकाश इंडस्ट्रीजच्या अपिलांना उचित ठरवत, रोखे अपील लवाद अर्थात सॅटने या कंपन्यांच्या समभागांवर लादल्या गेलेल्या व्यवहारबंदीला स्थगिती देणारा आदेश गुरुवारी दिला.

अनेक बडय़ा देशी तसेच विदेशी गुंतवणूकदारांसह, लक्षावधी भागधारक असलेल्या भांडवली बाजारात सूचिबद्ध ३३१ कंपन्यांना ‘संशयित शेल कंपन्या’ ठरवून भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’ने या कंपन्यांवर कारवाईचे आदेश सोमवारी रात्री संबंधित शेअर बाजारांना दिले आहेत. त्यानंतर गेले सलग तीन दिवस त्याचे तीव्र पडसाद बाजारात उमटले असून, सेन्सेक्स व निफ्टी दोन्ही निर्देशांकात जवळपास ३ टक्क्यांची घसरण झाली आहे.

‘सेबी’च्या या निर्देशाविरोधात जे. कुमार आणि प्रकाश इंडस्ट्रीज या दोन कंपन्यांनी बुधवारी सॅटकडे अपील दाखल केले. सॅटने या कंपन्यांच्या बाजूने निकाल दिल्याने शुक्रवारपासून या कंपन्यांच्या समभागांमध्ये बाजारात नियमित व्यवहार सुरू होऊ शकतील.

सेबीने या संशयित ३३१ शेल कंपन्यांची यादी ही गंभीर घोटाळे तपास अधिकारी, प्राप्तिकर विभाग यांनी केलेला तपास आणि त्याबरहुकूम कंपनी व्यवहार मंत्रालयाने दिलेल्या निर्देशांनुसार केली आहे. या ३३१ पैकी १६० कंपन्या  दृश्यरूपात कार्यरत व त्यांच्या समभागांमध्ये शेअरबाजारांमध्ये नियमितपणे सक्रियरूपात व्यवहार होत आले आहेत.