नाणारमधून स्थलांतरीत प्रकल्प भागीदारीत साकारण्याची चिन्हे

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आपल्या समूहातील महत्त्वाच्या पेट्रोलियम व्यवसायातील हिस्सा सौदीतील जगातील महाकाय तेल निर्यातदार कंपनीला विकण्याची तयारी करीत आहे. सौदी आराम्कोने रिलायन्समध्ये स्वारस्य दाखविल्याने महाराष्ट्रात समुद्र किनाऱ्यानजीक तेल शुद्धीकरण प्रकल्प भागीदारीत साकारण्याची शक्यता पुन्हा दिसू लागली आहे. यापूर्वी सौदी आराम्कोकडून प्रस्तावित नाणार प्रकल्पासाठीचे जागा संपादन राज्य सरकारने रद्दबातल केले आहे.

सौदी आराम्को ही जगातील सर्वात मोठी तेल निर्यातदार कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या तेल शुद्धीकरण व पेट्रोलियम व्यवसायात २५ टक्के हिस्सा खरेदी करण्याची तयारी करत आहे. हा व्यवहार १० ते १५ अब्ज डॉलरचा होण्याची शक्यता आहे.

आराम्कोने यापूर्वी ४४ अब्ज डॉलर मूल्याच्या तेल शुद्धीकरण व पेट्रोलियम कॉम्प्लेक्समध्ये ५० टक्के भागीदारी करण्याचा प्रयत्न केला होता. संयुक्त अरब अमिरातीतील अबु धाबी नॅशनल ऑइल कंपनीच्या सहकार्याने होत असलेला हा प्रयत्न नंतर बारगळला.

रिलायन्स – आराम्को – अबु धाबी नॅशनल ऑइल कंपनीच्या भागीदारीमुळे रत्नागिरीच्या समुद्रकिनारी वार्षिक ६ लाख टन क्षमतेचा इंधन शुद्धीकरण प्रकल्प   साकारण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. २०२५ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे.  भांडवली बाजारात मंगळवारअखेर नोंदले गेलेल्या ८.५० लाख कोटी रुपयांच्या मूल्यापैकी ४.२५ लाख कोटी रुपये समूहाला तेल शुद्धीकरण व्यवसायातून येतात. समूहाचे गुजरातेतील जामनगर येथे दोन प्रकल्प आहेत.

समूह मालवाहू जहाज उद्योगातील हिस्सा विक्री करणार

रिलायन्सच्या इंधनाची वाहतूक करणाऱ्या जहाज व्यवसायातील काही हिस्सा जपानच्या मित्सुइ ओएसएके लाइन्सला विकण्याबाबतचा करार समूहाने केला आहे. सिंगापूरच्या उपकंपनीबरोबर भागीदारी असलेल्या रिलायन्सचे या व्यवसायातील सहा कंपन्यांमधील हिस्सा विकण्यात येत आहे. ओएसके या १३५ वर्षे जुन्या कंपनीच्या ताफ्यात ८५० इंधन मालवाहतूक जहाजे आहेत.

ब्रिटिश नाममुद्रा हॅम्लीज रिलायन्सच्या ताब्यात

खेळणी उत्पादनातील हॅम्लीज ही जगप्रसिद्ध नाममुद्रा ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात रिलायन्स समूह आहे. समूहाच्या रिलायन्स रिटेलच्या दालनांमध्ये सध्या हॅम्लीजची खेळणी विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा परवाना रिलायन्सकडे आहे. हॅम्लीज १७६० मध्ये स्थापन झाली. तर रिलायन्स रिटेल ही समूहातील एक नफा नोंदविणारी कंपनी आहे.