कर्जदात्री स्टेट बँक आग्रही

नवी दिल्ली : कर्ज थकितापोटी कर्मचारी, वैमानिकांचे वेतन वेळेवर देऊ शकत नसलेल्या जेट एअरवेजच्या संचालक मंडळावरून पायउतार होण्याची सूचना स्टेट बँकेने प्रवर्तक नरेश गोयल तसेच त्यांच्या पत्नी अनिता गोयल यांना केली आहे. त्याचबरोबर या नागरी हवाई वाहतूक कंपनीचे कार्यकारी संचालक गौरांग शेट्टी व स्वतंत्र संचालक नसीम झैदी यांनाही कंपनीचे संचालक मंडळ सोडण्यास सांगितले आहे.

विविध वाणिज्य बँकांचे ३,५०० कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड थकीत असलेल्या जेट एअरवेजला दिलेल्या कर्जाचे रूपांतर समभागांमध्ये केल्यानंतर स्टेट बँकेला जेट एअरवेजमध्ये महत्त्वाचे स्थान मिळाले. कंपनीतील दुसरी मोठी भागीदार संयुक्त अरब अमिरातीतील एतिहाददेखील या कंपनीतील आपला  भागभांडवली हिस्सा विकू पाहात आहे. त्यामुळे स्टेट बँकेच्या कंपनीतील भागीदारीला महत्त्व प्राप्त झाले आहे. एतिहादने सर्व हिस्सा विकून बाहेर पडण्याची मानस व्यक्त करण्याबरोबरच, आपला हा हिस्सा स्टेट बँकेने घ्यावा, याबाबत आग्रह धरला आहे. गोयल यांचा जेट एअरवेजमध्ये ५१ टक्के भागभांडवली हिस्सा आहे. तो २२ टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

जेट एअरवेजवरील वाढत्या कर्जामुळे कंपनीला सध्या कर्मचाऱ्यांचे नियमित वेतन देणेही शक्य होत नाही. परिणामी दिवसाला ४५० विमान फेऱ्या घेणाऱ्या जेटमार्फत आता १५० फेऱ्याच घेतल्या जात आहेत. कंपनीच्या ताफ्यात सध्या केवळ ३५ विमानेच आहेत. पैकी नऊ विमाने कंपनीच्या मालकीची आहेत. कंपनीची सध्याची बिकट अवस्था पाहता गोयल पती-पत्नींनी संचालक मंडळावरील आपले पद सोडावे, अशी सूचना स्टेट बँकेने केल्याचे समजते.

जेट एअरवेजने तिच्या ताफ्यातील सर्व विमाने व परवानगी असलेल्या सर्व फेऱ्या पूर्वपदावर आणाव्यात, असे वाटत असल्याचे स्टेट बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी नुकतेच स्पष्ट केले होते. मात्र गोयल यांच्या पायउताराबाबत नेमके काही सांगण्याऐवजी तसे संकेत कुमार यांनी बुधवारी दिल्लीत झालेल्या याबाबतच्या बैठकीदरम्यान दिले होते.

जेट एअरवेजमधील समस्येबाबत सरकारी बँकांनी अर्थसाहाय्य करण्याची सूचना केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांनी केली होती. प्रतिनिधी, मुंबई</p>

तीन महिन्यांपासून अनियमित वेतन मिळालेल्या जेट एअरवेजच्या वैमानिक आणि अभियंत्यांनी अखेर आक्रमक भूमिका घेत उड्डाणे बंद करण्याचा इशारा दिला आहे. ३१ मार्चपर्यंत वेतन न झाल्यास १ एप्रिलपासून विमान न चालविण्याचे निश्चित करण्यात आले. जेट एअरवेज एअरक्राफ्ट मेन्टेनन्स इंजिनिअर्स असोसिएशनने (जेएएमईडब्ल्यूए) नागरी हवाई महासंचालनालयाला पाठवलेल्या ई-मेलमध्ये सद्यस्थितीत कंपनीच्या विमानांचे परिचालन हे प्रवाशांसाठी जोखमीचे ठरू शकते, असे नमूद केले आहे.