मुख्य पालक बँकेत विलीनीकरणाच्या विरोधात स्टेट बँकेच्या पाच सहयोगी बँकांमध्ये शुक्रवारी (२० मे) एक दिवसाच्या संपाची हाक देण्यात आली आहे. ‘एआयबीईए’ या संघटनेने पुकारलेल्या या आंदोलनात मुख्य स्टेट बँक अथवा अन्य कोणत्याही सार्वजनिक बँकांचे कर्मचारी सहभागी होणार नसून त्यात केवळ स्टेट बँकेच्या पाच सहयोगी बँकांचे देशभरातील कर्मचारी सामील असतील.
स्टेट बँकेने सहयोगी बँकांसह भारतीय महिला बँकेच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव मंगळवारी मंजूर केल्यानंतर लगेचच ‘ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन’ने (एआयबीईए) शुक्रवारच्या एक दिवसीय देशव्यापी संपाची हाक दिली. तिला ‘स्टेट सेक्टर बँक एम्प्लॉईज असोसिएशन’ (एसएसबीईए) या सहयोगी बँकांमधील कर्मचाऱ्यांच्या संघटनेनेही अनुमोदन दिले आहे.
देशातील निम्म्या भागात बँकिंग व्यवस्था नसताना स्टेट बँकेचे विलीनीकरण पाऊल हे सार्वजनिक बँकांच्या राष्ट्रीयीकरणाच्या विरोधातील असल्याचे ‘ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन’चे सरचिटणीस एस. नागराजन यांनी म्हटले आहे.
प्रमुख स्टेट बँकेच्या स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ बिकानेर अ‍ॅण्ड जयपूर, स्टेट बँक ऑफ पटियाळा, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर व स्टेट बँक ऑफ मैसूर या पाच सहयोगी बँका असून त्यांच्या डिसेंबर २०१५ अखेर देशभरात ५,७०० शाखा आहेत. या पाचपैकी तीन बँका भाडंवली बाजारात सूचिबद्ध आहेत. तर स्टेट बँक समूहातील स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र व स्टेट बँक ऑफ इंदूर यांचे गेल्या आठ वर्षांत मुख्य बँकेत विलीनीकरण झाले आहे.