रिझव्‍‌र्ह बँकेने सलग दुसऱ्यांदा केलेल्या रेपो दरकपातीचा लाभ स्टेट बँकेने तिच्या ग्राहकांना करून देणारे पाऊल उचलले आहे. देशातील सर्वात मोठय़ा बँकेने आपली कर्जे आता वार्षिक ८.५० टक्के व्याजदराने  देऊ केली आहेत.

स्टेट बँकेने निधी खर्चावर आधारित कर्ज व्याजदर (एमसीएलआर) ८.५५ टक्क्यांवरून ८.५० टक्के करण्यात आल्याचे मंगळवारी जाहीर केले. नव्या दराची मात्रा बँकेच्या सर्वच कर्जदारांना बुधवारपासूनच लागू होत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

नव्या दरबदलामुळे बँकेचे ३० लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाचे व्याजदर ०.१० टक्क्याने कमी झाले आहेत. ते आता ८.६० ते ८.९० टक्के दरम्यान असतील.

चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्याच द्विमासिक पतधोरणात रिझव्‍‌र्ह बँकेने रेपो दर पाव टक्के कमी करत तो ६ टक्के असा वर्षभराच्या तळात आणून ठेवला.

रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरणानंतर, सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्र आणि एचडीएफसी बँकेनंतर  दरकपात करणारी स्टेट बँक ही तिसरी बँक आहे.

तथापि रिझव्‍‌र्ह बँकेच्या पाव टक्का रेपो दर कपातीच्या तुलनेत, बँकांकडून प्रत्यक्षात झालेली ०.०५ टक्के व्याजदर कपात करून, २० टक्के लाभच ग्राहकांपर्यंत पोहचविला गेला आहे. बँकांकडून पुरेशा प्रमाणात रेपो दर कपातीचा लाभ सामान्य ग्राहकांपर्यंत पोहचविला जात नाही, अशी रिझव्‍‌र्ह बँकेचीही तक्रार राहिली आहे.