बँकांवर सक्षम उच्चाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांसाठी केंद्र सरकारकडून स्थापित ‘बँक ब्युरो बोर्ड’ या तज्ज्ञ मंडळाच्या शुक्रवारी येथे झालेल्या बैठकीत देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी बँकिंग क्षेत्राला भेडसावत असलेल्या बुडीत कर्जे (एनपीए) यासह मनुष्यबळ समस्या, नवीन जागांची भरती या विषयांवर चर्चा केल्याचे स्पष्ट केले. स्टेट बँकेचे मार्च २०१६ या चौथ्या तिमाहीचे आर्थिक निकाल अजून बाहेर यायचे आहेत, परंतु डिसेंबर २०१५ तिमाहीअखेर तिने वितरित केलेल्या एकूण कर्जात बुडीत कर्जाचे (एनपीए) प्रमाण ५.१० टक्क्यांवर (७२,७९१.७३ कोटी रुपये) पोहोचल्याचे आढळून आले आहे. खासगी व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे जाहीर झालेले निकाल पाहता, स्टेट बँकेच्या एनपीएमध्येही सरलेल्या चौथ्या तिमाहीत त्यात आणखी भर पडण्याचे कयास आहेत. ‘कॅग’चे माजी प्रमुख विनोद राय यांच्या अध्यक्षतेखाली स्थापित बँक ब्युरो बोर्डाचे अध्यक्ष आहेत.