देशातील उद्योग क्षेत्रातील स्थितीचा निदर्शक म्हणून बँकिंग अग्रणी स्टेट बँकेच्या पुढाकाराने नव्यानेच सुरू झालेल्या ‘एसबीआय कम्पोझिट इंडेक्स’ने महिन्यागणिक कल उतारच दर्शविणारा असल्याचे संकेत दिले. मंदावलेली कर्ज मागणी आणि चढे व्याजदर अशी याची कारणमीमांसा करण्यात आली आहे. अर्थात ही पाहणी रिझव्‍‌र्ह बँकेच्या गुरुवारच्या आश्चर्यकारक दरकपाती आधीची आहे.
एसबीआय निर्देशांकाचा डिसेंबर २०१४ मध्ये स्तर ५५.४ अंश म्हणजे उच्च वृद्धीदर दर्शविणारा होता, तो जानेवारी २०१५ मध्ये ५१.५ अंश असा अवनत झाल्याचे शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आलेली आकडेवारी सांगते. अर्थात जानेवारी २०१४ मधील ५०.६ अंशांच्या तुलनेत वार्षिक तत्त्वावर या निर्देशांकाने माफक प्रगती मात्र दर्शविली आहे.
जानेवारीच्या निर्देशांकाच्या मापनात, वाहनांच्या विक्रीत झालेली वाढ आणि महागाई दराने घेतलेली उसंत या सकारात्मक बाबी ठरल्या. त्याउलट कर्ज-उचल आणि नव्या गुंतवणुकीच्या संदर्भात मरगळ हा या निर्देशांकाचा नकारात्मक पैलू आहे, स्टेट बँकेच्या या संशोधन टिपणात सांगण्यात आले आहे.
स्टेट बँकेअंतर्गत होणारी कर्जाची मागणी व वितरण या आधारे या निर्देशांकाचे मापन करण्यात येते. शून्य ते १०० अंशांदरम्यान होणाऱ्या निर्देशांकातील मापनात, ५० या मध्यबिंदूच्या वर अथवा खाली हेलकावे हे वाढ व घसरण दर्शवणारे ठरतील. ४२ पेक्षा कमी अंश हा मोठा उत्पात, ४२ ते ४६ म्हणजे मध्यम घसरण, ४६ ते ५० माफक घसरण, ५० ते ५२ माफक वाढीचे द्योतक ठरेल, तर ५२ ते ५५ हे उच्च दरातील वाढ तर ५५ पेक्षा अधिक अंश नोंदविले जाणे हे अत्युच्च विकासाकडे दौड दर्शविणारे असेल.