मुंबई : रिझव्‍‌र्ह बँकेने बुधवारी केलेल्या घसघशीत रेपो दर कपातीला त्वरित प्रतिसाद देत स्टेट बँकेने गृहकर्जावरील व्याजदर कमी करत यंदाच्या कपात हंगामाचा श्रीगणेशा केला. देशातील या सर्वात मोठय़ा बँकेने कर्ज व्याजदर ०.१५ टक्क्यांनी  कमी करत वार्षिक ८.२५ टक्क्यांवर आणून ठेवले आहेत. यामुळे तूर्त मागणी थंडावलेल्या या क्षेत्रात अन्य बँकांनाही दरकपातीचे प्रोत्साहन मिळणार आहे. सण-समारंभाच्या तोंडावर परिणामी गृह, वाहन आदी कर्ज स्वस्त होणार आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेने ०.३५ टक्के रेपो दर कपातीसह प्रमुख दर बुधवारी दशकातील किमान स्तरावर आणून ठेवल्याचे जाहीर केले. त्यानंतर स्टेट बँकेने लगेचच गृह कर्ज व्याजदर ०.१५ टक्क्याने कमी करत वार्षिक ८.२५ टक्क्यांवर आणून ठेवले. नवे दर १० ऑगस्टपासून लागू होणार आहेत. एप्रिल २०१९ पासून बँकेने ०.३५ टक्क्याने कर्ज स्वस्त केल्याचे म्हटले आहे.

स्टेट बँकेने पतधोरणापूर्वीच गृह कर्ज तसेच ठेवींवरील दर ०.०५ टक्क्याने कमी केले होते. खासगी क्षेत्रातील एचडीएफसी समूहातील बँक, वित्त कंपन्यांनी गृह कर्जावरील व्याजदर ०.१० टक्क्यापर्यंत कमी केले होते. रिझव्‍‌र्ह बँकेच्या मोठय़ा प्रमाणातील रेपो दर कपातीमुळे अन्य बँकाही स्वस्त कर्ज उपलब्धततेचा धडाका लावण्याची शक्यता आहे.