मुंबई : भारतीय स्टेट बॅंकेने कर्जदर आणि ठेवीदरात सोमवारी नव्याने कपात केली. यामुळे कर्जदारांना दिलासा मिळाला असला तरी ठेवीदारांची मात्र निराशा होणार आहे.

या निर्णयाने बॅंकेचा एक वर्ष मुदतीचा ‘मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट’ अर्थात  एमसीएलआर ०.१० टक्क्याने कमी झाला असून तो आता ८.१५ टक्के असेल. यापूर्वी तो ८.२५ टक्के होता. यामुळे कर्जदारांचा मासिक हप्ता काही प्रमाणात कमी होणार आहे.

दरम्यान बॅंकेने ठेवींवरील व्याजदरात मोठी कपात केली आहे. सर्व मुदतीच्या ठेवीदरात ०.२० ते ०.२५ टक्क्याची कपात केल्याने व्याजावर अधिकतर अवलंबून असलेल्या ज्येष्ठ ठेवीदारांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मंगळवारपासूनच नवे कर्जदर लागू होतील, असे बॅंकेने स्पष्ट केले आहे.

स्टेट बँकेची चालू वित्त वर्षांतील ही पाचवी व्याजदर कपात आहे.

रेपो दर कपातीचा लाभ बॅंकांनी ग्राहकांना द्यावा यासाठी रिझव्‍‌र्ह बॅंक गेल्या काही महिन्यांपासून व्यापारी बँकांना आवाहन करत आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून सर्वच बॅंकांना बा मानकांवर आधारित दरांशी (रेपो) व्याजदर सलग्न करण्याचे निर्देश नुकताच मध्यवर्ती बँकेने बॅंकांना दिले आहेत. चालू आर्थिक वर्षांत बॅंकेने पाचव्यांदा ‘एमसीएलआर’ कमी केला आहे. बॅंकेचा कर्जाचा दर एक वर्षांसाठी ८.१५ टक्के झाला असून तीन वर्षांंसाठी तो ८.३५ टक्के असेल.

रोकड सुलभता वाढल्याने ठेवीदराचे व्याज कमी करण्यात आल्याचे स्टेट बॅंकेने म्हटले आहे. यानुसार सर्व मुदतीच्या ठेवींवरील व्याजदरात ०.२० ते ०.२५ टक्के कपात करण्यात आल्याचे बॅंकेने सोमवारी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.