सरकारी फंड घराणे असलेल्या एसबीआय म्युच्युअल फंड कंपनीने मालमत्तेबाबत एका स्थानाने मागे असलेल्या यूटीआय म्युच्युअल फंड खरेदीची इच्छा सरकारजवळ प्रदर्शित केली आहे. असे झाल्यास भारतीय म्युच्युअल फंड खरेदी – विक्रीतील हा सर्वात मोठा व्यवहार होणार असून एसबीआय ही देशातील सर्वात मोठी म्युच्युअल फंड कंपनी होईल.
देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने केंद्रीय वित्त खात्याला दिलेल्या प्रस्तावात एसबीआय म्युच्युअल फंडद्वारे यूटीआय म्युच्युअल फंड कंपनी ताब्यात घेण्याविषयी योजना सादर केली आहे. दरम्यान, याबाबत मुंबई शेअर बाजाराने स्टेट बँकेला स्पष्टीकरण मागितले आहे.
निधी व्यवस्थापनात सध्या एसबीआय म्युच्युअल फंड ही सहाव्या स्थानावर आहे. तर यूटीआय म्युच्युअल फंड कंपनी पाचव्या क्रमांकावर आहे. दोन्ही एकत्र आल्यास त्यांच्याकडून १.५ लाख रुपयांहून अधिक निधीचे व्यवस्थापन होईल. यामुळे याबाबत सध्या क्रमांक एकचे स्थान राखणारी एचडीएफसी म्युच्युअल फंड कंपनी मागे पडणार आहे.
डिसेंबर २०१४ अखेरच्या ८७,३९०.१३ कोटी रुपयांसह निधी व्यवस्थापन करणाऱ्या यूटीआय म्युच्युअल फंड कंपनीचे या क्षेत्रात सहावे स्थान आहे. तर ७२,१४०.६३ कोटी रुपयांसह एसबीआय म्युच्युअल फंड तिच्यापेक्षा एका स्थानाने आघाडीवर आहे. एकत्रिकरणानंतर ती देशातील सर्वात मोठी म्युच्युअल फंड कंपनी होईल.
ज्या यूटीआय म्युच्युअल फंड खरेदीचा प्रस्ताव स्टेट बँकेने दिला आहे त्या बँकेचा यूटीआयमध्येही हिस्सा आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ, बँक ऑफ बडोदा आणि पंजाब नॅशनल (प्रत्येकी १८.५ टक्के हिस्सा) या त्यातील अन्य तीन सरकारी भागीदार आहेत. तर २००३ मधील ‘यूनिट ट्रस्ट ऑफ इंडिया’चे यूटीआय म्युच्युअल फंडमध्ये रुपांतर झालेल्या निधी व्यवस्थापन कंपनीत अमेरिकेच्या टी रो प्राईसचाही २६ टक्के हिस्सा आहे.
भारतीय म्युच्युअल फंड क्षेत्रात गेल्याच वर्षी एचडीएफसी म्युच्युअल फंड कंपनीने मॉर्गन स्टॅनलेच्या आठ योजना ताब्यात घेत ३,२९० कोटींची मालमत्ता जमा केली होती. तर यापूर्वी लार्सन अ‍ॅन्ड टुब्रोनेही अमेरिकेची  फिडेलिटी ही फंड कंपनी खरेदी केली होती.
म्युच्युअल फंड व्यवसायात सध्या ४५ कंपन्या असून त्यांच्यामार्फत गुंतवणूकदारांच्या ११ लाख कोटी रुपयांहून अधिक निधीचे व्यवस्थापन होते.