४५,००० कोटींचे कर्ज मालमत्ता संपादित करण्याचे लक्ष्य

मुंबई : बँकिंग अग्रणी स्टेट बँकेने चालू वर्षांत चांगली पत गुणवत्ता असलेली गैरबँकिंग वित्तीय कंपन्यांची ४५,००० कोटी रुपयांपर्यंतची कर्ज प्रकरणे संपादित करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आयएल अ‍ॅण्ड एफएस समूह आणि तिच्या उपकंपन्यांना देणी फेडता न येणे आणि एकंदर रोकड तरलता गमावून बसलेल्या गैरबँकिंग वित्तीय कंपन्यांना तारू शकणारा हा निर्णय ठरला आहे.

बुधवारी भांडवली बाजारात स्टेट बँकेच्या या निर्णयाच्या पाश्र्वभूमीवर, बँकांच्या समभागांसह गेल्या काही दिवसांत दणक्यात आपटलेल्या गैरबँकिंग वित्तीय कंपन्यांच्या समभागांना मागणी मिळून त्यांचे समभागमूल्य वधारलेले दिसून आले. डीएचएफएलचा समभाग १६ टक्के, बजाज फायनान्स १० टक्के तर इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्सचा समभाग ३.६ टक्क्यांपर्यंत उसळी घेताना दिसून आला.

स्टेट बँकेने यापूर्वी १५,००० कोटी रुपयांची कर्ज मालमत्ता मिळविण्याची योजना असल्याचे म्हटले होते. तथापि मंगळवारी अतिरिक्त ३०,००० कोटी रुपयांपर्यंतची कर्जेही खरेदी करण्याचे नियोजन असल्याचे अंतर्गत मूल्यांकनाअंती बँकेने जाहीर केले. त्यामुळे चालू वर्षांत वित्तसंस्थांचे एकूण ४५ हजार कोटींची कर्जे हस्तगत करण्याचा बँकेने मानस व्यक्त केला.

गैरबँकिंग वित्तीय कंपन्यांकडील आकर्षक दरात उपलब्ध कर्ज मालमत्ता खरेदी करणे ही स्टेट बँकेसाठी उत्तम व्यापार संधी ठरण्याबरोबरच, बँकेच्या पतपुरवठय़ात वाढीसाठी ही बाब उपकारक ठरणार आहे. मुख्यत: प्राधान्य क्षेत्रातील कर्ज वितरणाचे लक्ष्य गाठण्यासाठी ही एक आकर्षक संधी ठरेल. स्टेट बँकेचे कर्ज-ठेव गुणोत्तर सध्या ६६ टक्के  असून, पतपुरवठय़ात वाढीसाठी आणखी भरपूर वाव असून, तो या मार्गाने पूर्ण केला जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे.