प्रदीर्घ काळ रखडलेले विमा सुधारणा विधेयक संसदेत मार्गी लागले आणि देशातील खासगी विमा क्षेत्रात विदेशी कंपन्यांची भागीदारी २६ टक्क्य़ांवरून ४९ टक्क्य़ांपर्यंत वाढविण्यास वावही खुला झाला. आता या कंपन्यांतील स्वदेशी भागीदारांनी आपले भागभांडवल केवळ विदेशी भागीदारांसाठीच नव्हे, तर खुल्या बाजारात भागविक्री (आयपीओ) करून सामान्य गुंतवणूकदारांमध्ये वितरित करण्यासाठी सौम्य करण्याच्या दिशेनेही पावले पडणे सुरू झाले आहे. बँकिंग अग्रणी स्टेट बँकेने आपल्या आयुर्विमा व सामान्य विमा अशा दोन्ही उपकंपन्यांतील भागभांडवल अशा पद्धतीने सौम्य करीत असल्याचा निर्णय घेतला आहे.

स्टेट बँकेच्या कार्यकारी समितीने एसबीआय लाइफ इन्श्युरन्स या उपकंपनीतील १० टक्के भागभांडवल सौम्य करण्याचा निर्णय घेतला असल्याचे, बँकेने मंगळवारी मुंबई शेअर बाजार (बीएसई)ला सूचित केले. काही दिवसांपूर्वीच स्टेट बँकेने ‘एसबीआय जनरल इन्श्युरन्स’ या सामान्य विमा क्षेत्रातील कंपनीतील आपले भागभांडवल सध्याच्या ७४ टक्क्य़ांवरून ५१ टक्के इतके सौम्य करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ऑस्ट्रेलियन भागीदार कंपनी- आयएजीला या कंपनीत ४९ टक्के मालकी प्रदान करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतला गेला.
एसबीआय लाइफ इन्श्युरन्स ही स्टेट बँक आणि फ्रान्सच्या बीएनपी परिबा कार्डिफ यांनी संयुक्तपणे सुरू केलेली कंपनी आहे. सध्या खासगी आयुर्विमा कंपन्यांत हप्त्यापोटी उत्पन्नाच्या निकषावर तिसऱ्या स्थानावर असलेल्या या कंपनीत स्टेट बँकेची ७४ टक्के, तर फ्रेंच कंपनीचा २६ टक्के भांडवली हिस्सा आहे. खासगी आयुर्विमा कंपन्यांमध्ये एसबीआय लाइफचा बाजारहिस्सा १५.२ टक्के असा आहे.
डिसेंबर २०१४ अखेर समाप्त आर्थिक वर्षांच्या नऊ महिन्यांत कंपनीने ६१५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे, जो आधीच्या वर्षांच्या तुलनेत १४ टक्क्य़ांनी वधारला आहे.

खासगी विमा कंपन्यांचे ‘आयपीओ’चे प्रांगणही खुले होणार
खासगी विमा कंपन्यांतील स्वदेशी भागीदारांना भांडवली बाजाराच्या माध्यमातूनही खुल्या विक्रीद्वारे आपला हिस्सा सौम्य करण्याचा पर्याय खुला झाला आहे. अद्याप त्या दिशेने ठोस पाऊल कुणा कंपनीकडून पडलेले नसले तरी त्या दिशेने सुसज्जता मात्र सुरू झाली आहे. विदेशी भागीदारांसाठी भागहिस्सा सौम्य करताना, समभागांच्या मूल्यांकनाचा प्रश्न तडीस लागल्यावर खुल्या भागविक्रीलाही (आयपीओ) अजमावून पाहिले जाईल; तथापि स्टेट बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक अशा बँकांद्वारे प्रवर्तित खासगी विमा कंपन्यांपेक्षा मॅक्स इंडिया, रिलायन्स कॅपिटल आणि बजाज फिनसव्‍‌र्ह यांसारख्या कंपन्या या विमा व्यवसायाचे एकूण व्यवसाय लक्षणीय योगदान असणाऱ्या कंपन्या हा दुसरा पर्याय अजमावण्याबाबत अधिक उत्सुक असतील.