वयाची १० वर्षे पूर्ण करणाऱ्या परंतु सज्ञानतेची पायरी म्हणजे वयाची १८ वर्षे पूर्ण नसलेल्या कुमार-कुमारींसाठी भारतीय स्टेट बँकेने शुक्रवारी नव्या बचत खात्याची सुविधा उपलब्ध करून दिली.
१० वर्षांवरील मुलांसाठी बचत खाते सेवा सुरू करण्याबाबत रिझव्‍‌र्ह बँकेने तीन महिन्यांपूर्वीच मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. १८ वर्षांखाली मुलांसाठीची ही सुविधा सध्या खासगी क्षेत्रातील कोटक महिंद्र बँक मोठय़ा प्रमाणात राबवित आहे.
स्टेट बँकेने लहानग्यांसाठी ‘पहली उडान’ व ‘पहला कदम’ या बचत खात्याचे पर्याय सुरू केले आहेत. पहिल्या योजनेसाठी १० ते १८ वयोगटातील कुमारांना त्यांचे बचत खाते स्वतंत्ररित्या हाताळता येणार आहे; तसेच त्यांच्यासाठी एटीएम कम डेबिट कार्ड, पासबुक, चेक बुकही असेल. बिल पेमेन्ट, मुदत ठेव खाते सुरू करणे तसेच नियत ठेवी आदींसाठी दिवसाला ५ हजार रुपये मर्यादेसह इंटरनेट बँकिंग सुविधाही देऊ केली आहे. ‘ऑटो स्विप’अंतर्गत किमान २० हजार मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. ‘पहला कदम’ योजनेंतर्गत अल्पवयीन मुलांना त्यांच्या पालकांना सह-खातेदार करून घ्यावे लागेल.