मुंबई : भारतीय स्टेट बँकेचा संयुक्त उपक्रम असलेल्या एसबीआय म्युच्युअल फंडाने जानेवारी महिन्यात २१,००० कोटी रुपयांची भर टाकत म्युच्युअल फंड उद्योगातील देशातील सर्वाधिक मालमत्ता असलेले फंड घराणे बनण्याचा मान पटकावला आहे.

जानेवारी २०२० अखेरीस ३.८२ लाख कोटी रुपयांच्या मालमत्तेसह एसबीआय म्युच्युअल फंड पहिल्या क्रमांकावर असून, एचडीएफसी म्युच्युअल फंड ३.७९ कोटींच्या मालमत्तेसह दुसऱ्या क्रमांकावर तर आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड ३.६८ लाख कोटींच्या मालमत्तेसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. मागील काही दिवस शेअर बाजारात सुरू असलेली तेजी आणि बँकांनी ठेवी दरांत केलेल्या कपातीमुळे रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडात वाढलेल्या गुंतवणूक ओघामुळे जानेवारी महिन्यात म्युच्युअल फंड उद्योगातील मालमत्ता एकंदर वाढली आहे.

एसबीआय म्युच्युअल फंडाकडे ६९५ फंड असून त्यापैकी ३३४ फंड गुंतवणुकीस कायम खुले (ओपन एंडेड) असणारे तर ३६१ मुदत बंद (क्लोज्ड एंडेड) फंड आहेत. एसबीआय म्युच्युअल फंड हे निश्चित गुंतवणूक पद्धत असलेले घराणे म्हणून ओळखले जाते. या फंड घराण्याच्या फंडाकडे अव्वल पोर्टफोलिओ असून अनुभवी निधी व्यवस्थापन चमूने विशेष प्रयत्न केल्याचे दिसत आहे. स्टेट बँक या नाममुद्रेला गुंतवणूकदारांची नेहमीच पसंती मिळते याचा फायदा एसबीआय म्युच्युअल फंडाला होत असून ग्रामीण भारतातील बँकेचे सर्वात मोठे शाखांचे जाळे असून त्यायोगे ग्राहकांमध्ये म्युच्युअल फंड गुंतवणुकीतील ‘एसआयपी संस्कृती’चा प्रचार-प्रसार होत असल्याचे मत स्पर्धक फंड घराण्याच्या एका अनामिक राहू इच्छिणाऱ्या अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’ला सांगितले.

इक्विटी फंडातही सर्वाधिक मालमत्ता

एसबीआय म्युच्युअल फंड हे एचडीएफसी म्युच्युअल फंडाला मागे टाकत १.९३ लाख कोटी रुपयांची समभागसंलग्न मालमत्ता असलेले फंड घराणे ठरले आहे. मुख्यत: भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून (ईपीएफओ) या फंड घराण्याकडे नियमितपणे सुरू असलेला गुंतवणूक ओघ खूपच उपकारक ठरला आहे. ईपीएफओला त्यांचा निधी इंडेक्स ईटीएफमध्ये गुंतवण्याला मुभा आहे आणि या गुंतवणुकीचे व्यवस्थापन एसबीआय म्युच्युअल फंडासह, यूटीआय म्युच्युअल फंडाकडून केले जाते. या मार्फत सुमारे ९५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक आली असून, म्युच्युअल फंड उद्योगातील ईपीएफओ ही एक सर्वात मोठी गुंतवणूकदार संस्था आहे.