मुंबई : म्युच्युअल फंड उद्योगात आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाने एचडीएफसी म्युच्युअल फंडाला मागे टाकत दुसरे स्थान पटकावले आहे, तर ५.०४ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणूकयोग्य गंगाजळीसह एसबीआय म्युच्युअल फंड अव्वलस्थानी कायम आहे.

एकूणच देशाच्या म्युच्युअल फंड उद्योगाने, व्यवस्थापनांतर्गत मालमत्ता मार्च २०२० मधील ३१.४२ लाख कोटींवरून, एप्रिल २०२० अखेर ३२.३८ लाख कोटी रुपये अशा अभूतपूर्व स्तरावर गेली आहे. एप्रिलअखेर उपलब्ध तपशिलानुसार, एचडीएफसी म्युच्युअल फंडाची व्यवस्थापन अंतर्गत मालमत्ता (एयूएम) ४.०७ लाख कोटी रुपये होते, तर आयसीआयसीआय म्युच्युअल फंडाची मालमत्ता ४.१३ लाख कोटी रुपये होती. या आकडेवारीनुसार एचडीएफसी म्युच्युअल फंड आता तिसऱ्या स्थानी ढकलले गेले आहे.

मार्च महिन्यात एचडीएफसी आणि आयसीआयसीआय प्रु. या फंड घराण्यांच्या मालमत्तांमध्ये १,००० कोटींचे अंतर होते. मात्र महिन्याभरात ती पिछाडी भरून काढून आयसीआयसीआय प्रुने ५,५०० कोटी रुपयांची आघाडी घेतली आहे.