उपकंपन्यांमधील हिस्सा विक्रीचा लाभ; पत गुणवत्तेतही लक्षणीय सुधार

मुंबई : पत गुणवत्तेतील सुधारणा आणि उपकंपन्यांमधील हिस्सा विक्रीचा लाभाचे प्रतिबिंब स्टेट बँकेच्या तिमाही कामगिरी दमदारपणे उमटले आहे. देशातील या सर्वात मोठय़ा बँकेने सप्टेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत ३,३७५ कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. वार्षिक तुलनेत सरकारी बँकेच्या नफ्याने सहापट झेप नोंदविली आहे.

उद्योगक्षेत्राला पतपुरवठय़ाची गती काहीशी संथ असली, तरी स्टेट बँकेने तिमाहीदरम्यान तुलनेत किरकोळ कर्जपुरवठय़ावर अधिक भर दिला. बँकेच्या अशा कर्जदारांचे प्रमाण एकूण कर्जदारांच्या तुलनेत सर्वाधिक ६० टक्के आहे.

जुलै ते सप्टेंबरदरम्यान स्टेट बँकेने कर्ज आणि ठेवींच्या प्रमाणात तब्बल २१२ टक्के वाढ झाली असून तो गेल्या तिमाहीअखेर ३,०११ कोटी रुपये झाला आहे.

बँकेच्या ढोबळ अनुत्पादित मालमत्ता प्रमाणात यंदाच्या तिमाहीत ७.१९ टक्के असा वर्षभरापूर्वीच्या ९.९५ टक्क्यांच्या तुलनेत सुधारणा झाली आहे. बँकेला निव्वळ व्याजामार्फत झालेले उत्पन्न १७.६७ टक्क्यांनी वाढून २४,६०० कोटी रुपये झाले आहे.

बँकेची आयुर्विमा क्षेत्रातील उपकंपनी असलेल्या एसबीआय लाइफमधील हिस्सा विक्रीतून ३,५०० कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे.

स्टेट बँकेने डीएचएफएलला दिलेल्या कर्जाची रक्कम ७,००० कोटी रुपये तर ऊर्जाक्षेत्राला १,२०० कोटी रुपये व दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांना दिलेल्या कर्जाची रक्कम ३५,००० कोटी रुपये असल्याचे बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी सांगितले.

चालू आर्थिक वर्षांत बँकेने नवीन ६०० शाखा सुरू केल्याचेही कुमार यांनी सांगितले. गेल्या वित्त वर्षांत बँकेकडून २७५ नव्या शाखा सुरू करण्यात आल्या होत्या, असेही ते म्हणाले.

भांडवली बाजारात १७ हजार कोटींचा लाभ

तिमाहीत नफ्यात सहापट झेप नोंदविणाऱ्या देशातील सर्वात मोठय़ा बँकेने संवत्सर २०७५ अखेरच्या व्यवहारात बाजार भांडवलात मोठी कमाई केली. स्टेट बँकेचा समभाग शुक्रवारी ७.२ टक्क्यांनी उंचावल्याने बँकेचे मुंबई शेअर बाजारातील एकूण भांडवल १६,८६८ कोटी रुपयांनी वाढले. शुक्रवारी बँकेचे समभाग मूल्य २८१.६० वर स्थिरावले.