देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेने सलग सहा तिमाहींनंतर प्रथमच एप्रिल ते जून २०१४ या चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफ्यात ३.३ टक्के वाढ दर्शविणारी कामगिरी केली आहे.
स्टेट बँकेने वितरित केलेल्या कर्जावर १३,२५३ कोटी रुपयांचे व्याज उत्पन्न मिळवीत मागील वर्षांतील याच तिमाहीच्या तुलनेत त्यात १५ टक्के वाढ साधली आहे. तसेच बँकेच्या शुल्काधारित उत्पन्नात १०.९० टक्के वाढ होऊन हे उत्पन्न २,८३७ कोटी रुपयांवर गेले आहे.
दरम्यान, निर्देशांकात मोठी पडझड होऊनही शुक्रवारी कामकाज बंद होताना मुंबई शेअर बाजारात स्टेट बँकेचा समभाग गुरुवारच्या तुलनेत ०.९० टक्के घट होऊन २४१५.२५ वर बंद झाला.

*बँकेने तिमाहीत ३,३४९ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला जो गेल्या वर्षी याच तिमाहीत ३,२४१ कोटी रुपये होता.
* या सरलेल्या तिमाहीत बँकेच्या थकीत कर्जासाठीच्या तरतुदीत लक्षणीय वाढ होऊनही निव्वळ नफा वाढला आहे.
* बँकेच्या ढोबळ अनुत्पादित कर्जाच्या (ग्रॉस एनपीए) प्रमाणात वर्षभरापूर्वीच्या ५.५६ टक्क्य़ांवरून ४.९० टक्के अशी घट झाली आहे.

“स्टेट बँकेचा कर्मचाऱ्यांवरील खर्चात ०.४५ टक्के वाढ होऊन ते ५,५६५ कोटी रुपयांवर गेले आहे. या पुढील काळात अनुत्पादित कर्जापोटी कोणतीही नवीन तरतूद बँकेला करावी लागणार नाही असा विश्वास असल्यानेच, कर्मचाऱ्यांच्या पेन्शन व ग्रॅच्युईटीपोटी होणाऱ्या संभाव्य खर्चाची १०० टक्के तरतूद बँकेने केली आहे.”
– अरुंधती भट्टाचार्य, स्टेट बँकेच्या अध्यक्षा निकालानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना