देशातील सर्वात मोठय़ा सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँके ने मुदत ठेवींवरील व्याजदरात ०.४० टक्यांची कपात केली आहे. बँके ने ठेवींवरील व्याजदर पंधरवडय़ात दुसऱ्यांदा मोठय़ा फरकाने कमी केले आहेत. बँकेने याचबरोबर २ कोटी किंवा त्याहून अधिक रकमेच्या मोठय़ा ठेवींवरील दर अर्ध्या टक्कय़ांनी कमी केले केले आहेत.

बँकेने वैयक्तिक ग्राहकांसाठी असलेल्या मुदत ठेवींवरील नवीन दर २७ मेपासून लागू केले आहेत. गुंतवणूकदारांना आता १ ते २ वर्षांच्या ठेवींवर वार्षिक ५.१ टक्के व्याज मिळणार आहे. त्याचप्रमाणे २ वर्षांपेक्षा अधिक, मात्र ५ वर्षांंपर्यंतच्या ठेवींवर ठेवींवर ५.३ टक्के व ५ वर्षांपेक्षा अधिक, परंतु १० वर्षांपर्यंतच्या ५.४ टक्के व्याज मिळू शकेल. स्टेट बँकेने १२ मे रोजी मुदत ठेवींवरील दर कमी केले होते. ज्येष्ठ नागरिकांना १ ते २ वर्षांदरम्यान ५.६ टक्के व्याज मिळेल. ३ ते ५ वर्षे कालावधीसाठी ५.८ टक्के व्याज उपलब्ध असेल. गुंतवणूकदारांना ५ ते १० वर्षांच्या ठेवींवर ६.२ टक्के व्याज मिळेल.

एलआयसी म्युच्युअल फंडांच्या स्थिर गुंतवणूक विभागाचे प्रमुख मर्झबान इराणी यांनी लोकसत्ताला सांगितले की, मुदत ठेवींवरील व्याजदर हा मागणी आणि पुरवठा यांचा एक भाग आहे. सध्या कर्जाला मागणी नसल्याने आणि बँकासुद्धा सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात असल्याने कर्ज देण्यापेक्षा रिझव्‍‌र्ह बँकेत रिव्हर्स रेपोत पैसे गुंतविणे पसंत करताना दिसत आहेत.