स्टेट बँकेची ‘एसबीआय जनरल’मधील ४ टक्के भागभांडवलाची विक्री

पीएनबी, इंडियन बँकेही ‘एक्सपेरियान’मधून बाहेर

मुंबई : भांडवलाची चणचण भासत असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी व्यावसायिकदृष्टय़ा महत्त्वाच्या नसलेल्या क्षेत्रातून बाहेर पडून, त्यातील भागभांडवलाच्या विक्रीतून निधी उभा करावा, अशा केंद्र सरकारकडूनच पुढे आलेल्या प्रस्तावाला अनुसरून पावले टाकायला सुरुवात केली आहे. बुधवारी दोन बँकांकडून तसा निर्णयही जाहीर करण्यात आला आहे.

बँकिंग अग्रणी स्टेट बँकेच्या कार्यकारी मंडळाने सर्वसाधारण विमा क्षेत्रात संयुक्त भागीदारीत प्रवर्तित कंपनी एसबीआय जनरल इन्शुरन्समधील ४ टक्के भांडवली हिस्सा विकण्याचा बुधवारी निर्णय घेतला. अ‍ॅक्सिस न्यू अपॉच्र्युनिटीज एआयएफ-१ आणि प्रमेजी इन्व्हेस्ट यांच्या पीआय अपॉच्र्युनिटीज फंड-१ यांच्याकडून हा हिस्सा खरीदला जाणार आहे. हा व्यवहार मार्गी लागल्यानंतर, एसबीआय जनरल इन्शुरन्समधील स्टेट बँकेचा भांडवली वाटा ७० टक्क्यांवर येईल, तर तिची विदेशी भागीदार आयएजी इंटरनॅशनलकडे २६ टक्के हिस्सा राहील.

पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) आणि इंडियन बँक या सरकारी बँकांनी ‘एक्सपेरियान’ या ग्राहकांचा पतविषयक लेखाजोखा राखणाऱ्या कंपनीतील संपूर्ण भांडवली हिस्सा विकत असल्याचे बुधवारी जाहीर केले. २०१० साली नेदरलँडस्थित गस होल्डिंग्ज बीव्हीद्वारे स्थापित या कंपनीत पीएनबीचा ३ टक्के, तर इंडियन बँकेचा २.१४ टक्के भांडवली हिस्सा आहे. या दोन बँकांव्यतिरिक्त अन्य खासगी व सार्वजनिक बँका तसेच बिगरबँकिंग वित्तीय कंपन्यांचाही या कंपनीत भांडवली वाटा आहे.

स्टेट बँकेला एसबीआय जनरल इन्शुरन्समधील हिस्सा विक्रीतून ४८२ कोटी रुपये मोबदलारूपाने प्राप्त होतील. तर पीएनबी आणि इंडियन बँकेला ‘एक्सपेरियान’मधील हिस्सा विक्रीतून अनुक्रमे २९.४० कोटी रुपये आणि २१ कोटी रुपयांचा लाभ होईल. मंगळवारी नवी दिल्लीत अर्थमंत्र्यांची सार्वजनिक क्षेत्रातील २१ बँकांच्या प्रमुखांबरोबर बैठक झाली. या बैठकीनंतर केंद्रीय वित्तीय सेवा सचिव राजीव कुमार यांनी सरकारी बँकांना बिन-महत्त्वाच्या व्यवसायातून अंग बाहेर काढून आणि तत्सम मालमत्तांच्या विक्रीतून चालू वर्षांत १८,००० कोटी रुपये उभे करता येतील, असे प्रतिपादन केले होते.