१४ लाख डॉलरच्या फसवणूकप्रकरणी अटकेची टांगती तलवार असणाऱ्या सॅमसंग कंपनीच्या अध्यक्षांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले. ७२ वर्षीय ली कुन-ही यांना सहा आठवडय़ांसाठी भारताबाहेर जाऊ देण्यास प्रतिबंध करतानाच गाझियाबाद न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
विद्युत उपकरण निर्माती कंपनी सॅमसन्गचे अध्यक्ष असलेल्या ली यांच्याविरुद्ध जेसीई कन्सल्टन्सी या भारतीय कंपनीने गाझियाबाद येथील न्यायालयात १४ लाख डॉलरच्या फसवणुकीचा खटला दाखल केला आहे. यानंतर ली यांनी उच्च न्यायालयासह सर्वोच्च न्यायालयातही त्याला आव्हान दिले. दोन्ही ठिकाणी ली यांची याचिका फेटाळण्यात आली.
न्यायालयात सुनावणीच्या वेळी उपस्थित न राहिल्याबद्दल ली यांच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाचे न्या. सी. के. प्रसाद व पी. सी. घोष यांच्या खंडपीठाने सोमवारी अटकेचे आदेशही जारी केले. या प्रकरणात आता न्यायालयाने ली यांना प्रत्यक्ष न्यायालयात हजर होण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे भारताबाहेर जाऊ देण्यास ली यांना प्रतिबंधही करण्यात आला आहे.