गेल्या काही वर्षांत भारतातील दुचाकी बाजारपेठेत स्कूटरचा हिस्सा २६ टक्क्यांनी वाढला असून, सध्याचा कल पाहता येत्या दोन ते तीन वर्षांत हा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे. मध्यंतरीच्या काळात जवळजवळ विस्मरणात गेलेली स्कूटर आता परत एकदा नव्याने उदयास येत आहे. भारतात गेल्या पाच महिन्यांत विकली गेलेली दर चौथी दुचाकी ही स्कूटर आहे.  
‘सियाम’कडून प्राप्त माहितीनुसार, ऑगस्ट २०१४ मध्ये १३ लाख ४५ हजार ५०६ दुचाकींची विक्री झाली. गेल्या वर्षी याच कालावधीत ११ लाख २८ हजार ६३१ दुचाकींची विक्री झाली होती. म्हणजे विक्री १९.२२ टक्क्यांनी वाढली. तर याच वर्षभरात स्कूटर्सच्या विक्रीत वाढीचा टक्का ३०.४४ इतका आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये २,८३,१४२ स्कूटर्स विकल्या गेल्या होत्या, तर यावर्षी याच महिन्यात ३,६९,३२३ स्कूटर्सची विक्री झाली. २०१३ मध्ये देशभरात साधारण ३५ लाख स्कूटर्स विकल्या गेल्या आहेत.
गेल्या काही वर्षांत स्कूटरच्या स्टायिलगबरोबर, मोटारसायकलप्रमाणे तिच्या इंधनक्षमतेसारख्या महत्त्वाच्या वैशिष्टय़ांवरही उत्पादक लक्ष देऊ लागल्यामुळे, शहरी पुरुष आणि स्त्री या दोघांच्याही स्कूटर्सच्या पसंतीत वाढ झाली आहे. शिवाय मोटारसायकलमध्येही मिळत नाही अशा काही वैशिष्टय़ांच्या समावेशामुळे स्कूटर्स चालविण्यास सोप्या आहेत.
दोन दशकांपूर्वी स्कूटी आल्यापासून चित्र बदलले असून स्कूटर्सच्या बाजारपेठेत तरुणींच्या वर्गाची दखल घेतली गेली. टीव्हीएस मोटर कंपनीने १९९३ साली पहिल्यांदाच तरुण मुलींसाठी खास स्कूटी लाँच केली. स्कूटीनंतर सहा वर्षांनी होंडाने अ‍ॅक्टिव्हा दाखल केली. तेव्हापासून गिअर्सच्या स्कूटर्स मागे पडल्या आणि त्यांची जागा ऑटोमॅटिक स्कूटर्सनी घेतली. स्कूटरला आलेला चांगला काळ पाहून विविध कंपन्यांनी आपली नवनवी मॉडेल्स बाजारात आणली.
एकटय़ाने फिरणे पसंत करणाऱ्या तरुणींच्या इच्छेला होंडाच्या अ‍ॅक्टिव्हाने आणखी खतपाणी घातलं. कंपनीने स्त्री व पुरुष अशा दोघांनाही वापरण्यासारख्या अ‍ॅक्टिव्हा १२५ सीसी आणि अ‍ॅक्टिव्हा आय या गाडय़ा आणल्या. कंपनीने कॉम्बी ब्रेक, अ‍ॅलॉय व्हील, डिस्क ब्रेक आणि चांगल्या इंधनक्षमतेसाठी होंडा इको टेक्नॉलॉजी इंजिन (एचईटी) ही वैशिष्टय़ेही दिली. हिरो मोटोकॉर्पनेही विशिष्ट ग्राहक डोळ्यासमोर ठेवत पुरुषांसाठी मायस्त्रो आणि स्त्रियांसाठी प्लेझर या मॉडेल प्रस्तुत केल्या. तर स्कूटी झेस्ट ११०चे अनावरण करून टीव्हीएसने स्कूटी हा ब्रँड आणखी पुढे नेला आहे.
स्कूटर बाजारपेठेत १५ टक्के हिस्सा राखणाऱ्या टीव्हीएसने आज ग्राहकांसाठी स्कूटर्सचे बरेच पर्याय उपलब्ध केले आहेत. दर महिन्याला ६०,००० स्कूटर्सची विक्री कंपनी करीत असून नियत अंतराने नवीन प्रस्तुती करून स्कूटर्सची विक्री मासिक ७५,००० पर्यंत नेण्याचा आणि बाजारहिस्सा १८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे नियोजन असल्याचे टीव्हीएस मोटर कंपनीचे मार्केटिंग प्रमुख अनिरुद्ध हल्दर यांनी सांगितले.
‘हमारा बजाज’ची पुन्हा स्वारी?
वर्ष २००७ मध्ये तत्कालीन स्कूटर बाजारपेठेवर अधिराज्य असलेल्या बजाज ऑटोने स्कूटरचे उत्पादन थांबवून केवळ मोटारसायकल उत्पादनावर लक्ष केंद्रित करण्याचे धोरण स्वीकारले. त्या वेळी स्कूटरची विक्री वार्षिक १० लाख होती, आज ती ३५ लाखांवर पोहोचली आहे. बाइक्सच्या तुलनेत स्कूटर्सच्या विक्रीचा वाढलेला टक्का पाहता, ‘हमारा बजाज’चा घोष सर्वतोमुखी करणारी ‘चेतक’ नाममुद्रा पुन्हा रस्त्यावर धावताना दिसेल काय? राजीव बजाज या स्वाभाविक प्रश्नाचे थेट उत्तर देणे टाळत आले असले तरी बजाज ऑटोने फेरविचाराच्या दिशेने लवचीकतेचे संकेत जरूर दिले आहेत.