22 March 2019

News Flash

पर्लच्या फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना भरपाईची शक्यता

सूचित करण्यात आलेल्या गुंतवणूकदारांची संख्या २,५०० पर्यंत आहे.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

कागदपत्रे सादर करण्याचे ‘सेबी’चे आवाहन

नवी दिल्ली : फसवणूक झालेल्या पर्लच्या गुंतवणूकदारांनी मूळ कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन भांडवली बाजार नियामक सेबीने केले आहे. गुंतवणुकीतील रक्कम परत मिळण्यासाठी याबाबत निरोप मिळालेल्यांनी त्वरित कागदपत्रे सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे.

मोबाइल लघू संदेशाद्वारे (एसएमएस) याबाबत संबंधित गुंतवणूकदारांना कळविण्यात आले असून त्यांनीच कागदपत्रे सादर करावयाची आहेत, असे याबाबत नेमण्यात आलेल्या माजी मुख्य न्यायमूर्ती आर. एम. लोढा समितीने म्हटले आहे.

सूचित करण्यात आलेल्या गुंतवणूकदारांची संख्या २,५०० पर्यंत आहे. पर्ल समूहाने अधिक परताव्याच्या आमिषाद्वारे फसविलेल्या गुंतवणूकदारांना रक्कम परत करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ही कार्यवाही होत आहे.

पर्ल योजनेशी संबंधित मूळ प्रमाणपत्रे, पावत्या सादर केल्यानंतर गुंतवणूकदारांनी नमूद केलेल्या बँक खात्यात रक्कम जमा होईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

पर्ल समूहाने शेती तसेच स्थावर मालमत्तेच्या माध्यमातून गुंतवणूकदारांकडून १८ वर्षांमध्ये ६०,००० कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमविली होती. गुंतवणूकदारांना त्यांची रक्कम परत मिळण्यासाठीची प्रक्रिया लोढा समितीच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे.

First Published on August 11, 2018 3:17 am

Web Title: sebi asks investors in pacl to produce original docs for refunds