२५ लाख गुंवणूकदारांकडून ३१०० कोटी रुपये जमा करणाऱ्या आणि गुंतवणुकीवरील आकर्षक परताव्यासह तारांकित हॉटेलमधील खान-पानसह निवासाचीही सुविधा देणाऱ्या ‘पॅनकार्ड क्लब’वर सेबीने र्निबध आणले आहेत. गुंतवणूकदारांकडून नव्याने निधी गोळा करण्यास या कंपनीला गुरुवारपासून बंदी आणली आहे.
मुंबईस्थित ही कंपनी समूह गुंतवणूक योजनेंतर्गत विविध योजना राबविते. कंपनीच्या एका योजनेनुसार ३,६०० रुपयांच्या गुंतवणुकीवर ६६ महिन्यांनंतर ४,८०० रुपये मिळतात. शिवाय कंपनीच्या व्यवसाय भागीदार असलेल्या हॉटेलमध्ये वर्षांतून एकदा चार रात्रीसाठीचे निवास मोफत मिळते. मात्र गुंतवणूक व त्यावर परतावा तसेच अन्य भेट अशा कोणत्याही व्यवहारासाठी सेबीने परवानगी दिलेली नाही, असे स्पष्ट करत कंपनीवर र्निबध घालण्यात आले आहे. गुंतवणूकदारांकडून नव्याने कोणताही निधी गोळा करता येणार नाही. अन्य सात योजनांमध्ये नव्याने गुंतवणूक करण्यावर मर्यादा घालण्यात आली आहे. कंपनीला नव्या योजना बाजारात आणण्यासह कोणतीही नवी कंपनी सुरू करता येणार नाही.
संशयास्पद समूह
गुंतवणूक योजनेबाबत कारवाई करण्याचे सेबीला मिळालेल्या नव्या अधिकाराखाली ही कारवाई झाली असावी. चुकीच्या पद्धतीने ही कंपनी गुंतवणूकदारांकडून रक्कम गोळा करत असेल आणि कायद्याच्या चौकटीत ते बसत नसेल तर हा विषय गंभीर आहे.
मधुकर कात्रागड्डा, कार्यकारी समिती सदस्य, अखिल भारतीय रिसॉर्ट विकास संघटना.