सेबी अध्यक्षांकडून म्युच्युअल फंडांची कानउघाडणी

पतमापन संस्थांनी अ‍ॅम्टेक ऑटो, श्रेई इन्फ्रा, जिंदाल स्टील अँड पॉवर यांच्या रोख्यांची पतधारणा कमी केल्याने त्यात गुंतवणूक असणाऱ्या म्युच्युअल फंड योजनांच्या मालमत्ता मूल्यातील तीव्र घसरणीच्या पाश्र्वभूमीवर सेबी अध्यक्ष यू के सिन्हा यांनी म्युच्युअल फंडांना चांगलेच खडसावत अधिक सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला.
म्युच्युअल फंडांची शिखर संस्था असलेल्या असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया अर्थात अ‍ॅम्फीच्या सर्वसाधारण सभेत सेबीचे अध्यक्ष बोलत होते. फंडांनी रोखे गुंतवणूक करताना आदर्श व्यवहार पद्धतींचा अवलंब करून अधिक दक्षता बाळगण्याची गरज असल्याचे सिन्हा यांनी प्रतिपादन केले.
पतनिर्धारण संस्थांवर आंधळा विश्वास न ठेवता फंड घराण्यांनी स्वत:च डोळसपणे या रोखे गुंतवणुकीतील धोके समजून घेणे आवश्यक आहे. सरलेल्या जुलअखेपर्यंत म्युच्युअल फंडांची पत नसलेल्या रोख्यांत ४,००० कोटी रुपयांची गुंतवणूक होती. तर ऑगस्टअखेर या पतमापन संस्थांकडून या पत खालावल्या गेलेल्या रोख्यांतील त्यांची एकूण गुंतवणूक १३,००० कोटींपर्यंत वाढली, याकडे सिन्हा यांनी लक्ष वेधले.
ऑगस्ट महिन्यात सेबीने फंड घराण्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ई-मेल संदेश पाठवून स्थिर उत्पन्न गुंतवणुकीच्या नियमांचा आढावा घेऊन त्यात आवश्यकता भासल्यास बदल करण्याचे सूचित केले होते.