गुंतवणूकदारांचे २० हजार कोटी रुपये परत करण्यासाठी सहाराकडे तगादा लावणाऱ्या सेबीने समूहाकडे नव्याने तब्बल ३७ हजार कोटी रुपयांची मागणी सर्वोच्च न्यायालयाच्या समोरच शुक्रवारी लावून धरली.
सहाराने आपल्या दोन उपकंपन्यांद्वारे सुमारे ३७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक जमा केल्याचे सेबीने न्यायालयात सांगितले. सहाराच्याच म्हणण्यानुसार गुंतवणूकदारांची मूळ रक्कम २५,७८० कोटी रुपये, तर व्याज वगैरे धरून एकूण रक्कम ही ३७,००० कोटी रुपये होते, असे भांडवली बाजार नियामक ‘सेबी’चे वकील प्रताप वेणूगोपाल यांनी म्हटले.
यासाठी सेबीच्या वकिलांनी, ३१ ऑगस्ट २०१२ रोजी सर्व रक्कम ही पैसे जेव्हापासून घेतले, तेव्हापासून वार्षिक १५ टक्के दराने दिली जाईल, या सहाराच्या वक्तव्याचा आधार घेतला. सहाराने नवा रक्कम देय कार्यक्रम न्यायालयात सादर केल्यानंतर वेणूगोपाल यांनी ही बाब न्यायालयासमोर अधोरेखित केली.
सर्वोच्च न्यायालयातील सकाळच्या सुनावणीदरम्यान सहारा समूहाच्या वकिलांमार्फत १७,४०० कोटी रुपये ठरावीक हप्त्याने देण्याच्या प्रस्तावावर न्या. राधाकृष्णन यांनी पहिला हप्ता आकर्षक असल्याची उपहासात्मक टीका केली, तर दुपारच्या प्रतिवादादरम्यान सेबीच्या वकिलाने ही रक्कम अधिक, ३४,००० कोटी रुपये असल्याचे न्यायालयाला सांगितल्यावर न्यायमूर्तीनी हा प्रस्तावच धुडकावून लावला.
गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी सहाराने सादर केलेला नवा परतफेडीचा प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नाकारला. सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठाचे न्या. के. एस. राधाकृष्णन आणि जे. एस. खेहर यांनी ‘हा तुमचा शेवटचा प्रस्ताव आहे काय? पैसै देण्याची इच्छा नसलेल्यांकडून अशाप्रकारे आमचा अपमान केला जात आहे,’ असे सुनावत सहाराचा प्रस्ताव धुडकावून लावला. समूहाने सादर केलेला प्रस्ताव हा आम्हाला मान्यतेचा वाटत नसल्याने आम्ही तो स्वीकारत नाही, असेही समूहाच्या वकिलांना सुनावण्यात आले.
सहाराने मंगळवारच्या सुनावणी दरम्यान २२,५०० कोटी रुपयांची बँक हमी देऊ केली होती, तर शुक्रवारी बँकेने १७,४०० कोटी रुपये रोख रक्कम सहा समान तिमाही हप्त्यात अदा करण्याचा प्रस्ताव सादर केला.
सहाराचे वकील सी. ए. सुंदरम यांनी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान समूह येत्या तीन दिवसांत २,५०० कोटी रुपये दिले जातील आणि उर्वरित १४,९०० कोटी रुपये जुलै २०१४ पासून सुरू होणाऱ्या पाच तिमाही हप्त्यात (समान २,००० ते ३,९०० कोटी रुपये) देईल, असे सांगितले. शेवटचा हप्ता जुलै २०१५ मध्ये देण्यात येईल, असेही या वेळी नमूद करण्यात आले.
टप्प्याटप्प्याने पैसे फेडण्याचा सहाराचा प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला
कोठडी अन् अंकुश!
तिहार तुरुंगात असलेल्या रॉय यांना नवी दिल्लीतील पोलीस कोठडीत ठेवण्याबाबत मंगळवारच्या सुनावणीत निर्णय करण्यात आला. परंतु वित्त सल्लागार, वकील यांना सुब्रतो रॉय यांना सकाळी १० ते दुपारी १२ दरम्यानच भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे.