भांडवली बाजाराचे नियम पायदळी तुडविणारे तसेच गुंतवणूकदारांना फसविणारे, बँकांचे कर्जबुडवे आदींविरुद्धची नियामकाची जप्तीची कारवाई गेल्या आर्थिक वर्षांत पाच पटींनी वाढली आहे.
सेबीने २०१४-१५ मध्ये अशा प्रवृत्तींविरुद्ध १,६१० प्रकरणांत जप्तीची कारवाई केली असून ती आधीच्या वर्षांतील २९९ प्रकरणांपेक्षा पाच पट अधिक आहे. सेबीच्या वार्षिक अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
सेबीने केलेल्या या कारवाईमध्ये संबंधितांची बँक खाती गोठविण्यापासून संबंधित कंपन्या, संस्थांचे समभाग, रोखे आदींवर आणलेल्या जप्तीचाही समावेश आहे. भांडवली बाजाराच्या नियमांना हरताळ फासून व्यवहार करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध बाजार नियामक सर्वप्रथम दंड आकारणारे पाऊल उचलते. त्यात समोरच्याकडून अपयश आल्यास संबंधितांकडून जमा केलेली रक्कम ताब्यात घेते. याउपर संबंधित कंपन्यांच्या स्थावर-जंगम मालमत्तांवर जप्तीची कारवाई होते.
२०१४-१५ मध्ये सेबीने अशा प्रकरणात ५७१ बँक जप्तीच्या नोटिसा बजावल्या होत्या. तर डिमॅट खाती गोठवण्याच्या नोटिशींची संख्या १,०३९ आहे. गेल्या आर्थिक वर्षांत १२१ प्रकरणात रक्कम परत मिळविण्याचा प्रयत्न यशस्वी झाला असून यामार्फत १९ कोटी आले आहेत. २०१३-१४ मधील सहा प्रकरणांतील ७.८ कोटी रुपयांपेक्षा ही रक्कम निश्चितच अधिक आहे.