भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’च्या नवीन दंडकांनुसार रोख्यांमधील गुंतवणुकीबाबत सल्ल्याची सेवा देण्यासाठी रीतसर परवाना घेणे बंधनकारक केले गेले असतानाही, गेल्या दोन वर्षांत असा परवाना मिळविणारे देशभरातून ३०० हून कमी लोक असल्याचे आढळून आले आहे.
गुंतवणूकदारांच्या हितरक्षणाच्या दृष्टीने ‘सेबी’ने गुंतवणूकविषयक सल्ला देणाऱ्या व्यक्ती नोंदणीकृत असाव्यात आणि विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वांचे त्यांनी पालन करावे, असा दंडक जानेवारी २०१३ पासून अमलात आणला. अशा प्रकारच्या सेवेत कार्यरत पण नोंदणी न केलेल्या मंडळींना रीतसर परवाना मिळविण्यासाठी पुरेसा अवधीही दिला गेला. पण ‘सेबी’च्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार, आजवर केवळ २६८ सल्लागारांनीच परवाना प्राप्त केला असल्याचे आढळून येते. या नव्या निर्देशांबाबत ‘सेबी’कडून खूप गांभीर्याने पावले टाकली जाणार असून, पुढील एका वर्षांत अधिकाधिक गुंतवणूक सल्लागारांना या नियमनाअंतर्गत आणण्याचा आपला मानस असल्याचे अलीकडेच ‘सेबी’ अध्यक्ष यू. के. सिन्हा यांनी एका जाहीर कार्यक्रमात बोलताना स्पष्ट केले.