जोखीमेच्या असलेल्या कंपन्यांच्या रोख्यांमध्ये होणाऱ्या म्युच्युअल फंडातील गुंतवणूक चर्चेचा व चिंतेचा विषय ठरला असतानाच सेबीने एकूणच फंड कंपन्यांची झाडाझडतीचा निर्णय घेतला आहे. फंडांची कंपनी समभाग, रोख्यांमध्ये वाजवीपेक्षा जास्त गुंतवणुकीचा बाजार नियामक यंत्रणा तपास घेणार आहे.
८०० कोटी रुपयांची देणी असलेल्या अ‍ॅम्टेक ऑटोमधील मोठय़ा गुंतवणुकीने जेपी मॉर्गन म्युच्युअल फंडाच्या दोन योजना अडचणीत आल्यानंतर समस्त फंड उद्योगातून होणारी गुंतवणूक सेबी तपासून पाहणार आहे. प्रसंगी याबाबत फंडांची चौकशीही सेबी करणार असल्याचे कळते. अ‍ॅम्टेक ऑटोसह तिची उपकंपनी कास्टेक्स टेक्नॉलॉजीतील भाव-लबाडी सेबीच्या रडारवर आहे.
दरम्यान, हा विषय म्युच्युअल फंड कंपन्यांची संघटना असलेल्या ‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स ऑफ इंडिया’च्या बुधवारच्या बैठकीत येण्याची शक्यता आहे.
गुंतवणूक कल जाणून घेणार
आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून कोटय़वधींच्या ठेवी स्वीकारणाऱ्या कंपन्यांच्या मुसक्या आवळणाऱ्या सेबीने गुंतवणूकदारांचा नेमका कल जाणून घेण्याबाबत उत्सुकता दाखविली आहे. वैयक्तिक गुंतवणूकदारांच्या सवयी काय, नेमके काय पाहून ते बचत करतात हे जाणून घेण्यासाठी निल्सनच्या सहकार्याने देशव्यापी सर्वेक्षण होणार आहे.