तीन कोटी गुंतवणूकदारांची २४ हजार कोटी रुपयांची देणी थकवल्याप्रकरणी सहारा समूहाचे अध्यक्ष सुब्रतो रॉय यांची बुधवारी सेबीने कसून चौकशी केली. सहारा समूहाच्या इतर तीन उच्चाधिकाऱ्यांचीही सेबीने चौकशी केली. दरम्यान सेबीला आपल्या वैयक्तिक मालमत्तेच अधिक रस असल्याचा आरोप सुब्रतो रॉय यांनी केला.
सहारा इंडिया रिअल इस्टेट कॉर्पोरेशन लि. (एसआयआरईसीएल) आणि सहारा हाऊसिंग इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लि. (एसएचसीआयएल) या दोन कंपन्यांच्या माध्यमातून सहारा समूहाने अनुक्रमे ६३८० आणि १९ हजार ४०० कोटी रुपये निधीची उभारणी केली. या निधी उभारणीत अनेक गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर सेबीने सहाराच्या या आर्थिक व्यवहारांवर अंकुश आणला होता. तीन कोटी गुंतवणूकदारांची २४ हजार कोटी रुपयांची देणी थकवल्याप्रकरणी सेबीने सुब्रतो रॉय यांच्यासह अशोक रॉयचौधरी, रविशंकर दुबे आणि वंदना भार्गव या तीन उच्चाधिकाऱ्यांना सेबीसमोर चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार हे चौघेही बुधवारी सेबीच्या चौकशीला सामोरे गेले.
माझ्या मालमत्तेत सेबीला रस
सुब्रतो रॉय आणि त्यांच्या तीनही सहकाऱ्यांची सुमारे तासभर चौकशी चालली. चौकशीनंतर बाहेर आलेल्या सुब्रतो रॉय यांनी मात्र सेबीला आपल्या वैयक्तिक मालमत्तेतच रस असल्याचा दावा केला. संपूर्ण चौकशीत सेबीने आपल्याकडील वैयक्तिक मालमत्तेच्या तपशीलाबाबतच अधिक चौकशी केली, त्यांना माझ्या वैयक्तिक मालमत्तेतच जास्त रस असल्याचे वाटते असा शेराही त्यांनी पत्रकारांशी बोलताना मारला. आपण यापूर्वीच सेबीकडे सर्व तपशील दिला असून त्यात लपवण्यासारखे काहीच नसल्याचा दावाही त्यांनी केला.
सेबीकडे ५१२० कोटी अडकले
दरम्यान, सेबीकडे आपल्या समूहाने ५१२० कोटी रुपये जमा केले असून त्याचे वितरण अद्याप सेबीने न केल्याने गुंतवणूकदारांची देणी थकली असल्याचा दावाही सुब्रतो रॉय यांनी केला. गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे वेळेवर मिळत नसल्याबद्दल सहारा समूहाला चिंता लागून राहिली असल्याचेही ते म्हणाले.
एक कप चहाही नाही..!
चौकशीच्या तासात आपल्याला साधा एक कप चहाही सेबीच्या अधिकाऱ्यांनी दिला नाही. सेबीकडे आम्ही पाच हजार कोटींहून अधिक निधी जमा केला आहे. तसेच या प्रकरणी अनेक प्रकारे आम्हाला खर्च करावा लागत आहे. असे असतानाही माणुसकी म्हणूनही सेबीने एक कप चहाचा प्रस्तावही आपल्यासमोर ठेवला नाही, हे निषेधार्ह असल्याचे सुब्रतो रॉय म्हणाले.