दलाली पेढय़ांकडून पुनर्विचाराचे आर्जव

मुंबई : अनेक गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय असलेल्या निफ्टी निर्देशांक आणि समभागांवरील ‘इंट्रा डे’ सौद्यांना भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’च्या नवीन फर्मानाने पूर्णपणे ग्रहण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या फर्मानानुसार अशा सौद्यांसाठी मार्जिन रूपात पूर्ण रक्कम अग्रिम रूपात संबंधित शेअर बाजार, पर्यायाने दलालांना वसुल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या नवीन फर्मानामुळे, ‘इंट्रा डे’ प्रकारच्या सौद्यांचे आकर्षण पूर्णपणे संपुष्टात आणणारा परिणाम साधला जाईल. विशेषत: छोटय़ा आणि प्रादेशिक स्वरूपाच्या दलाली पेढय़ांमधून जवळपास निम्मे व्यवहार याच प्रकारच्या सौद्यांवर आधारीत असतात. शिवाय एकंदर बाजारात होणाऱ्या दैनंदिन व्यवहारांमध्ये कपात साधणारा परिणाम घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘सेबी’ने या आदेशाबाबत पुनर्विचार करावा, अशी विनवणी दलाली पेढय़ांकडून करण्यात येत आहे. ‘सेबी’च्या या आदेशाची १ जानेवारीपासून अंमलबजावणी सुरू झाली आहे.

काही दलाली पेढय़ा त्यांच्या ग्राहकांकडून जमा प्रारंभिक रकमेवर ५० ते १०० पट अधिक मूल्याचे सौदे करण्याची मुभा देतात आणि बाजारातील दिवसाचे व्यवहार संपण्याआधी या प्रकारच्या सौद्यातून विक्री करून बाहेर पडणे बंधनकारक असते. उदाहरण स्वरूपात, निफ्टी फ्युचर्सच्या सौद्यांसाठी एक निर्धारीत खंड (लॉट) ९.२१ लाख रुपयांचा आहे. नव्या फर्मानानुसार, या सौद्यांसाठी ११.५ टक्के मार्जिन रक्कम म्हणजे १.०५ लाख रुपये इंट्रा डे ट्रेडर्सकडून वसुल करण्याचे संबंधित शेअर बाजारांना सांगण्यात आले आहे. आजवर याच सौद्यांसाठी केवळ २० हजार रुपयांच्या घरात रक्कम इंट्रा डे ट्रेडर्सकडून दलाली पेढय़ा घेत असत. समभागांमधील सौद्यांसाठी याच प्रमाणात अल्प रकमेवर इंट्रा डे ट्रेडर्सना व्यवहार करता येत होते.

काव्‍‌र्ही स्टॉक ब्रोकिंगमध्ये अलिकडे घडलेल्या गैरव्यवहाराच्या प्रकारानंतर, जोखीमविषयक दक्षता म्हणून हे नवीन फर्मान भांडवली बाजाराने काढले असल्याचे सांगण्यात येते. यापूर्वी दलाली पेढय़ांना त्यांच्या ग्राहकांच्या समभाग आणि जमा रकमेच्या वापरावर निर्बंध आणणारे पाऊलही सेबीकडून टाकण्यात आले.