म्युच्युअल फंडाच्या मल्टिकॅप योजनांच्या मालमत्तेचे फेरवाटप करण्याच्या आणि स्मॉल कॅप गुंतवणुकीला झुकते माप देणाऱ्या ‘सेबी’च्या शुक्रवारी आलेल्या फर्मानाचे प्रतिबिंब भांडवली बाजारात सोमवारी उमटलेले दिसले. भांडवली बाजाराचे प्रमुख निर्देशांक अर्थात सेन्सेक्स-निफ्टीत सोमवारी घसरण झाली असताना, निफ्टी स्मॉल कॅप १०० निर्देशांक ५.४४ टक्के, तर बीएसई स्मॉल कॅप निर्देशांक ४.०३ टक्के उसळताना दिसले. करोनाच्या धास्तीने मार्चमधील झालेल्या पडझडीत सर्वाधिक हानी सोसलेल्या या समभागांमध्ये बऱ्याच मोठय़ा कालावधीनंतर दिसून आलेली ही दमदार वाढ आहे.

‘सेबी’च्या ११ सप्टेंबरच्या परिपत्रकानुसार, मल्टिकॅप फंडाच्या एकूण मालमत्तेपैकी किमान २५ टक्के गुंतवणूक प्रत्येकी लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप समभागात ३१ जानेवारी २०२०पर्यंत गुंतवणूक करण्याचे निर्देश म्युच्युअल फंड घराण्यांना देण्यात आले आहेत. अनेक मल्टिकॅप फंडात सध्या स्मॉल कॅप एक अंकी अथवा जवळजवळ शून्यवत असल्याने या निर्णयाच्या परिणामी स्मॉल कॅप समभागांना मोठी मागणी वाढेल अशी आशा निर्माण झाली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, ‘सेबी’च्या आदेशाचे पालन करायचे तर पुढील चार महिन्यांत साधारणत: ४० हजार कोटी स्मॉल कॅप व मिड कॅप समभांगामध्ये गुंतले जाणे क्रमप्राप्त दिसून येते.

जागतिक भांडवली बाजारातून सकारात्मक संकेत असताना, सोमवारी स्थानिक बाजारात सेन्सेक्स-निफ्टीला प्रारंभीच्या सत्रातील सकारात्मक सूर कायम ठेवता आला नाही. सेन्सेक्स सलग तिसऱ्या सत्रात चांगली वाढ दर्शवेल अशी आशा केली जात असताना, बाजारात नफावसुलीसाठी समभागांची विक्री सुरू झाल्याचे दिसून आले. परिणामी सेन्सेक्सने ९७.९२ अंशांच्या नुकसानीसह दिवसाचे व्यवहार ३८,७५६.६३ या पातळीवर थांबविले. बरोबरीने निफ्टी निर्देशांकही २४.४० अंशांची घट दाखवीत दिवसअखेरीस ११,४४०.०५ पातळीवर स्थिरावला.

माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील एचसीएल टेक तिमाहीतील उत्तम महसुली कामगिरीमुळे १०.०८ टक्के झेप घेत सर्वाधिक वाढ राखणारा समभाग ठरला. या उद्योग क्षेत्रातील टीसीएस, इन्फोसिस, टेक महिंद्र आणि टायटन यांनी प्रत्येकी ५ टक्के व अधिक वाढ राखली.