लोकसभेत केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांकडून खुलासा

नवी दिल्ली : अदानी समूहातील काही कंपन्यांची सेबी तसेच महसूल तपास संचालनालयामार्फत चौकशी सुरू असल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सोमवारी लोकसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात दिली.

दरम्यान, तपास यंत्रणांना संपूर्ण सहकार्य केले जात असल्याचे अदानी समूहाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. आक्षेप घेण्यात आलेले प्रकरण जुने असून याबाबत तपास यंत्रणांना हवी ती माहिती पुरवण्यात येत आहे, असेही कंपनीने नमूद केले.

अदानी समूहातील काही कंपन्यांच्या गुंतवणुकीवरून समूहाचे मुख्य प्रवर्तक गौतम अदानी चर्चेत आले होते. याबाबत तपास नियंत्रणामार्फत चौकशी सुरू असल्याचे संसदेच्या पावसाळी अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी स्पष्ट करण्यात आले.

अर्थ राज्यमंत्री चौधरी यांनी सांगितले की, मॉरिशसस्थित सहा फंडांमधील तीन गुंतवणूक खात्यांबाबत अदानी समूहाची चौकशी सुरू आहे. ‘ग्लोबल डिपॉझिटरी रिसिप्ट’ जारी करण्याच्या मुद्दय़ावरून २०१६ मध्ये ही खाती गोठवण्यात आली होती.

चौकशी सुरू असलेल्या अदानी समूहातील उपकंपन्यांची नावे केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांनी लोकसभेतील स्पष्टीकरणादरम्यान जाहीर केली नाहीत. तसेच या कंपन्यांनी नेमके कोणत्या नियमांचे उल्लंघन केले हेही स्पष्ट केले नाही.

अदानी समूहातील काही उपकंपन्यांमधील परकीय गुंतवणूक कंपन्यांच्या स्वारस्य व त्यावरील कारवाईच्या चर्चेने काही दिवसांपूर्वी समभाग मूल्यावर विपरीत परिणाम झाला होता. ही विदेशी गुंतवणूक गोठवण्यात आल्याची माध्यमांमध्ये चर्चा होती.