बेकायदेशीर रोख्यांमध्ये गुंतलेला पैसा परत करण्यासाठी तजवीज म्हणून सहारा समूहाने सर्वोच्च न्यायालयाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद सूचीतील अनेक मालमत्तांची मालकी नेमकी कुणाची याबद्दल प्रचंड साशंकता असल्याचे हे प्रकरण उकरून काढणाऱ्या ‘सेबी’च्या वरिष्ठ सूत्रांनी व्यक्त केली आहे. काही मालमत्तांचे मालकीपत्र हे कर्मचाऱ्यांच्या नावे तर काहींमध्ये सहाराचा आंशिक हक्क तर मालकी त्रयस्थ व्यक्तीच्या नावे असल्याचे आढळून आली आहे, असा गोपनीय अहवाल ‘सेबी’ने तपासाअंती तयार केला  असून, तो सर्वोच्च न्यायालयापुढे ठेवला जाणार आहे. या मालमत्ता नेमक्या कोणत्या हे ंसेबी’च्या सूत्रांनी स्पष्ट केलेले नाही. तरी मालकीबद्दल गोंधळ असल्यास, त्यांच्या विक्रीतही अडचणी निर्माण होणार आणि या प्रकरणी हात पोळलेल्या गुंतवणूकदारांना २०,००० कोटींची रकमेच्या परतफेडीचा गुंता आणखी वाढणार आहे.