देशातील दोन आघाडीच्या सार्वजनिक बँकांवर सोमवारी दंड कारवाईचा बडगा उगारला गेला. पैकी रोख्यांचे विश्वस्त विषयाशी संबंधित निकषांचे उल्लंघन केल्याबद्दल ‘सेबी’ने विजया बँकेला १० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. विजया बँकेची सेबीकडे रोखे विश्वस्त म्हणून नोंदणी आहे. तर भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेने केलेल्या काही सूचनांचे उल्लंघन केल्याबद्दल रिझव्‍‌र्ह बँकेने भारतीय स्टेट बँकेशी संलग्न असलेल्या स्टेट बँक ऑफ त्रावणकोरला एक कोटी रुपये दंड ठोठावला आहे.
रोख्यांचे विश्वस्त म्हणून एका प्रकरणात सदर बँकेने निकषांचे उल्लंघन केल्याचे उघड झाले आहे. सेबीने सप्टेंबर २०१३ मध्ये विजया बँकेची तपासणी केली. बँकेने एप्रिल २००७ ते मार्च २०१३ या कालावधीत केलेल्या विविध व्यवहारांशी संबंधित दस्तऐवजाची सेबीच्या पथकाने पाहणी केली.
भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेने केलेल्या काही सूचनांचे उल्लंघन केल्याबद्दल रिझव्‍‌र्ह बँकेने भारतीय स्टेट बँकेशी संलग्न असलेल्या स्टेट बँक ऑफ त्रावणकोरला एक कोटी रुपये दंड ठोठावला आहे.
नियमांचे पालन करण्यात काही त्रुटी आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. बँक आणि ग्राहक यांच्यातील करार अथवा एखाद्या व्यवहाराची वैधता याबद्दल स्टेट बँक ऑफ त्रावणकोरवर कारवाई करण्यात आलेली नाही, असे रिझव्‍‌र्ह बँकेने स्पष्ट केले आहे.
सेंट्रल रिपॉझिटरी ऑफ इन्फॉर्मेशन ऑन लार्ज क्रेडिट्सला (सीआरआयएलसी) माहिती उपलब्ध करून न देण्यासह अन्य सूचनांचे उल्लंघन केल्याबद्दल स्टेट बँक ऑफ त्रावणकोरला दंड ठोठावण्यात आला आहे, असेही रिझव्‍‌र्ह बँकेने स्पष्ट केले आहे.
सर्व कर्जदारांची पतविषयक माहिती गोळा करणे, ती साठवून ठेवणे आदी कामांसाठी रिझव्‍‌र्ह बँकेने सीआरआयएलसीची स्थापना केली आहे. कर्जदारांचा पाच कोटी रुपयांचा अथवा त्याहून अधिकच्या व्यवहाराची माहिती सीआरआयएलसीला देणे बँकांवर बंधनकारक आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने या बँकेवर कारणे-दाखवा नोटीसही बजावली आहे.