कंपन्यांना कर्जफेड थकल्याचा सत्वर खुलासा बंधनकारक करणारा लवकरच नियम

नवी दिल्ली : भांडवली बाजारात सूचिबद्ध कंपन्यांकडून जर कर्ज थकविले गेले तर त्याची माहिती वेळेवर सूचित केली जाऊन, तपशीलवार खुलासा होणे हे एकंदर पारदर्शकतेच्या दृष्टीने आवश्यक असून, तसे बंधनकारक करणारा नियम लागू करण्याबाबत बाजार नियंत्रक ‘सेबी’ची आग्रही भूमिका असल्याचे स्पष्ट होत आहे.

बुडीत कर्जे ही सध्या बँकिग व्यवस्थेतील मोठी समस्या असून, कर्जफेडीला जोखीम असल्याची बाब वेळीच पुढे आल्यास ते कर्जदात्या बँकांसाठी उपयोगी ठरेल, अशी ‘सेबी’ची यामागे भूमिका आहे. शिवाय भांडवली बाजाराची पारदर्शकता आणि सामान्य भागधारकांच्या हिताच्या दृष्टीने ही बाब पथ्यावर पडेल. ‘सेबी’च्या २०१७-१८ वार्षिक अहवालातही या प्रस्तावाचा संदर्भ आला आहे.

मार्चमध्ये ‘सेबी’चे अध्यक्ष अजय त्यागी यांनी सूचिबद्ध कंपन्यांकडून कर्ज थकविले जाण्याच्या प्रवृत्तीला चाप म्हणून असा सत्वर खुलासा बंधनकारक करणारा नियम बनविण्याचा प्रस्ताव सेबीच्या संचालक मंडळापुढे विचारार्थ असल्याचे सांगितले होते. पाश्चिमात्य विकसित राष्ट्रांच्या भांडवली बाजारात या नियमाचे सूचिबद्ध कंपन्यांकडून अनेक वर्षांपासून पालन केले जात आहे. आपल्याकडेही हा नवीन नियम येत्या १ ऑक्टोबरपासूनच अमलात येईल असे निश्चितही केले गेले होते. तथापि, बँकांनीच अधिक वेळ दिला जावा अशी मागणी केल्याने तो लांबणीवर टाकला गेला होता.

*  प्रस्ताव काय?

कर्जफेडीचा हप्ता थकला असेल तर सूचिबद्ध कंपन्यांना कामकाजाचा एक दिवस पूर्ण होण्यापूर्वी ताबडतोब तसे शेअर बाजारांना कळविणे बंधनकारक ठरेल.

* फायदे काय?

या माहितीचा पारदर्शी खुलासा झाल्यास गुंतवणूकदारांना कंपनीची समस्या ओळखून सुज्ञतेने निर्णय घेणे सुलभ जाईल. शिवाय, पंजाब नॅशनल बँकेबाबत तब्बल १४,००० कोटी रुपयांचे कर्ज सूचिबद्ध कंपनीकडून कित्येक वर्षे लक्षात न येता थकविले गेल्यासारख्या प्रकरणांना यातून पायबंद बसू शकेल.