७,००० कोटी रुपये वसुलीची प्रक्रिया; २६० कोटी राखीव किंमत

गुंतवणूकदारांकडून घेतलेले ७,००० कोटी रुपये वसूल करण्यासाठी पॅनकार्ड क्लबच्या विविध ११ मालमत्तांचा लिलाव करण्याची प्रक्रिया अखेर लवकरच सुरू होणार आहे. भांडवली बाजार नियामक सेबीने येत्या महिन्यापासून सुरू होणाऱ्या या प्रक्रियेकरिता २६० कोटी रुपये राखीव किंमत निश्चित केली आहे.

यंदाच्या पॅनकार्ड क्लबच्या लिलाव प्रक्रियेबाबतचा हा दुसरा टप्पा असेल. यापूर्वी कंपनीच्या २२ मालमत्तांचा लिलाव पार पडला आहे. त्यासाठी ५५२ कोटी रुपयांची राखीव किंमत निश्चित करण्यात आली होती.

यंदाची ही प्रक्रिया एसबीआय कॅपिटल मार्केट्स २१ मार्च रोजी पार पाडणार आहे. यामध्ये पॅनकार्ड क्लबच्या विविध १० मालमत्ता तसेच कंपनीचे दिवंगत अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुधीर मोर्वेकर यांच्या एका मालमत्तेचा समावेश आहे.

पॅनकार्ड क्लबच्या मालकीच्या महाराष्ट्रसह गोवा, राजस्थान आणि हरयाणा येथील हॉटेल, रिसॉर्ट, जमीन, कार्यालयांचा लिलाव केला जाणार आहे, असे सेबीच्या नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.

गुंतवणूकदारांचे ७,००० कोटी रुपये परत करण्याबाबत सेबीने दोन वर्षांपूर्वी आदेश देऊनही पॅनकार्ड क्लब अयशस्वी ठरल्याने आता लिलाव प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे.

कंपनीने २००२ ते २०१४ दरम्यान ५१.५५ लाखांहून अधिक गुंतवणूकदारांकडून ७,०३५ कोटी रुपये अधिक परताव्याच्या दाव्याने जमा केले होते. याअंतर्गत जागा तसेच हॉटेल सुविधा देण्याची कबूल केले होते.