छोटय़ा गुंतवणूकदारांना ७,००० कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या पॅनकार्ड क्लबच्या आणि तिच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांच्या २४ मालमत्तांचा लिलाव बाजार नियंत्रक ‘सेबी’ने पुढील महिन्यात योजला आहे. या मालमत्तांच्या लिलावासाठी एकूण राखीव किंमत २,१०० कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे.

डिसेंबर ते मार्च या कालावधीत पॅनकार्ड क्लबशी संलग्न ३३ मालमत्तांचा लिलाव पूर्ण करण्यात आला असून, त्यांचे एकूण राखीव मूल्य हे ८०० कोटी रुपयांपेक्षा अधिक होते. या व्यतिरिक्त काही नवीन मालमत्तांच्या लिलावाची सेबीची योजना आहे. सेबीकडून वितरित नोटिशीनुसार, पॅनकार्ड क्लबच्या १०, तर तिचे दिवंगत अध्यक्ष सुधीर मोरावेकर यांच्या मालकीच्या तीन मालमत्तांचा लिलाव ९ मे रोजी एसबीआय कॅपिटल मार्केट्सकडून केला जाणार आहे. या मालमत्तांसाठी एकूण राखीव किंमत २,०८७ कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे. म्हणजे इच्छुकांना या किमतीच्या पुढे बोली लावता येणार आहे.

लिलाव होत असलेल्या या मालमत्तांमध्ये चार तारांकित हॉटेल, रिसॉर्ट्स, जमिनीचे भूखंड, कार्यालयीन जागा आणि दुकाने यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि केरळ अशा राज्यातील या मालमत्ता आहेत. या मालमत्तांचा प्रकार, त्यांची सध्याची अवस्था, त्यावरील कर्ज भार व अन्य दायित्व, संपादनाचे दावे, कोर्ट कज्जे या संबंधाने सर्व तपासणी बोलीदारांना स्वत:हून करून घ्यावी, असे सेबीने स्पष्ट केले आहे. या मालमत्तांची विक्री ही त्यांच्याशी संलग्न सर्व ज्ञात आणि अज्ञात दावे आणि भारासह केली जात असून, कोणा तिसऱ्या पक्षाकडून सांगितला जाणारा दावा, हक्क अथवा थकिताची मागणी झाल्यास त्यासाठी ‘सेबी’ला जबाबदार धरता येणार नाही, असा खुलासाही केला आहे.

पॅनकार्ड क्लबने बेकायदेशीरीत्या गुंतवणूकदारांकडून गोळा केलेल्या ७,००० कोटी रुपयांच्या ठेवी परत करण्याच्या सेबीने फेब्रुवारी २०१६ मध्ये दिलेल्या आदेशाचे पालन केले नाही, त्यानंतर हे कारवाईचे पाऊल टाकण्यात आले.