मद्यसम्राट विजय मल्याचे हजारो कोटींचे कर्जबुडवेगिरीचे प्रकरण गाजत असताना, भांडवली बाजार नियंत्रक सेबीने अशा जाणूनबुजून बँकांचे कर्ज बुडविणाऱ्यांना (विलफुल डिफॉल्टर) निधी उभारणीचे अन्य स्रोतही बंद करण्याबाबत पावले टाकण्याचे स्पष्ट केले आहे. भांडवली बाजारासंदर्भात व्यापक सुधारणा राबवून नवउद्यमी (स्टार्ट अप्स) कंपन्यांना निधी उभारणीचे नियम शिथिल करणार आहे.
‘सेबी’च्या संचालक मंडळाच्या शनिवारी होत असलेल्या बैठकीच्या विषयपत्रिकेवर भांडवली बाजाराच्या सखोलतेने विस्तारासह, छोटय़ा गुंतवणूकदारांचे हितरक्षण या मुद्दय़ांना अग्रक्रम राहील, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले. अर्थमंत्री अरुण जेटली हे या बैठकीला उपस्थित राहून, यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या घोषणांच्या अनुषंगाने सेबीच्या संचालक व उच्चाधिकाऱ्यांच्या सज्जतेची चाचपणी करतील.
वाणिज्य बँकांकडून ‘विलफुल डिफॉल्टर’ घोषित करण्यात आलेल्या कर्जबुडव्यांबाबत रिझव्‍‌र्ह बँकेची साथ करीत ‘सेबी’ने काही कठोर उपाययोजना आखल्या आहेत. अशा मंडळींना व त्यांनी प्रवर्तित केलेल्या अन्य कंपन्यांना बँकांतून नव्याने कर्ज साहाय्य मिळणे अवघड असतेच, पण त्यांना भांडवली बाजारात निधी उभारणीचे अन्य मार्गही बंद केले जातील, असा सेबीचा प्रयत्न आहे.
एखादी कंपनी अथवा व्यक्ती पुरेसा रोखीचा प्रवाह सुरू असताना आणि नक्त मत्ता उत्तम असतानाही जाणूनबुजून कर्जदायित्व पूर्ण करीत नाही अथवा मुद्दामहून कर्जदार कंपनीला अपाय पोहचून घेतलेले कर्ज अन्य कारणांसाठी तिने वळविले असल्यास, ‘विलफुल डिफॉल्टर’ अशी रिझव्‍‌र्ह बँकेच्या व्याख्येत ती व्यक्ती वा कंपनी बसते. अशा कंपनी व प्रवर्तकाला अन्य सूचिबद्ध कंपनीचे नियंत्रण व्यवहारात अडवणूक करणे, असाही एक मार्ग सेबीकडून पुढे येऊ शकेल.