कंपन्यांच्या संचालक मंडळाच्या मूल्यांकनाची आवश्यकता मांडतानाच कंपनी सुशासनाचा आराखडा अधिक भक्कम करण्यासाठी संशोधनाची गरज असल्याचे प्रतिपादन सेबीचे पूर्णवेळ सदस्य जी. महालिंगम यांनी केले.

भांडवली बाजाराचा न्याय मंच असलेल्या रोखे अपील लवादाच्या आदेशांच्या ई-पुस्तकाचे प्रकाशन महालिंगम यांच्या हस्ते गुरुवारी झाले. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसई) मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमास यावेळी ‘एनएसई’चे अध्यक्ष अशोक चावला, मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. व्ही. एम. कानडे व ‘एनएसई’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम लिमये उपस्थित होते.

कंपनी सुशासनाच्या आराखडय़ामध्ये लक्षणीय सुधारणा करण्याची गरज यावेळी महालिंगम यांनी मांडली. त्याचबरोबर कंपन्यांच्या संचालक मंडळाचे मूल्यांकन होण्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले.

कोटक महिंद्र बँकेचे कार्यकारी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक उदय कोटक यांनी कंपनी सुशासनाबाबत नुकतेच जाहीर केलेल्या उपाययोजनांचा उल्लेख करत महालिंगम यांनी, कंपनी सुशासनाबाबत अधिक सुधारण्यास करण्यास वाव असल्याचे स्पष्ट केले.

रोखे अपील लवाद अस्तित्वात आल्यापासून ३१ मार्च २०१६ पर्यंतच्या आदेशाचा समावेश असलेले ई-पुस्तिकेचा कंपनी विधी सल्लागार तसेच धोरणकर्त्यांना लाभ होईल, असा विश्वास महालिंगम यांनी व्यक्त केला. लवादाने आपल्या स्थापनेपासून तब्बल २,००० आदेश जारी केल्याची माहिती विक्रम लिमये यांनी यावेळी दिली. ई-पुस्तक नियामक तसेच कंपनी विषयाचे अभ्यासक-विद्यार्थी, व्यावसायिकांना मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या ई-पुस्तकेची सुधारित आवृत्ती जूनमध्ये प्रकाशित करण्यात येईल, असे ते म्हणाले.