भारत बाँड ईटीएफची दुसरी शंृखला येत्या जुलैमध्ये नवीन मालिकेच्या स्वरूपात सुरू करणार असल्याचे एडेल्वाइस अ‍ॅसेट मॅनेजमेंटने कंपनीने स्पष्ट केले आहे. सध्याच्या वातावरणात गुंतवणूकदारांना निश्चित उत्पन्न असणाऱ्या सुरक्षित, प्रवाही आणि कर कार्यक्षम पर्यायांची आवश्यकता आहे आणि भारत बाँड ईटीएफकडून ही गरज प्रभावीपणे पूर्ण केली जाणार आहे.

भारत बाँड ईटीएफ हा सरकारी निधी उभारणीचा उपक्रम असून एडेल्वाइस एएमसीला त्याच्या रचना आणि व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली आहे. डिसेंबर २०१९ मध्ये या ईटीएफचा प्रारंभिक टप्पा प्रस्तुत करण्यात आला होता.

दोन नवीन ईटीएफ मालिकेच्या प्रस्तुतीतून, एडेल्वाइस म्युच्युअल फंडाने बाजारातील मागणीच्या आधारे ११,००० कोटी रुपयांच्या अधिक वाटपाच्या (ग्रीन शू) पर्यायासह प्रारंभिक ३,००० कोटी रुपये जमा करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे, असे या फंड घराण्याने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनातून म्हटले आहे. या दोन नवीन मालिकांची मुदतपूर्ती एप्रिल २०२५ आणि एप्रिल २०३१ अशी असेल, असे एडेल्वाइस म्युच्युअल फंडाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी राधिका गुप्ता यांनी सांगितले. भारत बाँड ईटीएफच्या पहिल्या टप्प्यात गुंतवणूकदारांच्या विविध गटांकडून १२,४०० कोटी रुपये जमा झाले आहेत.