केंद्र सरकारने आगामी सहा महिन्यांत (एप्रिल ते सप्टेंबर) सार्वभौम सुवर्ण रोख्यांच्या विक्रीच्या सहा टप्प्यांची घोषणा मंगळवारी केली. सरकारच्या वतीने रिझव्‍‌र्ह बँकेकडून ही रोखे विक्री व्यवस्थापित केली जाते आणि सामान्य ग्राहकांना यासाठी निर्धारित बँक शाखा आणि टपाल कार्यालयातून हे रोखे खरेदी करता येतील.

सोन्याच्या किमतीत गेल्या काही महिन्यांपासून दमदार तेजी सुरू असून, जागतिक अर्थव्यवस्थेवरील अनिश्चिततेचे सावट पाहता ती अशीच सुरू राहणे अपेक्षित आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने आवश्यक महसुली स्रोत म्हणून ही सुवर्ण रोखे विक्रीला गतिमानता दिली असण्याची शक्यता बोलून दाखविली जाते.

उल्लेखनीय म्हणजे सामान्य गुंतवणूकदाराला एक ग्रॅम सोन्याच्या मूल्याइतकी किमान गुंतवणूक करून या आठ वर्षे मुदत कालावधी असलेल्या रोखे विक्रीत सहभागी होता येते. सोन्याच्या किमतीत दीर्घावधीत होणारी वाढ हा या गुंतवणुकीवर परतावा असेल, शिवाय वार्षिक २.५ टक्के दराने व्याज या रोख्यांवर गुंतवणूकदारांना मिळू शकेल. त्याचप्रमाणे भांडवली नफ्यातून मिळालेली रक्कम या रोख्यांमधून गुंतवून मुदतपूर्तीला ती करमुक्त रूपात गुंतवणूकदारांना मिळविता येईल. अशी तरतूद म्युच्युअल फंडाच्या गोल्ड ईटीएफमध्ये अथवा सोने धातूतील गुंतवणुकीवर मिळविता येत नाही.

सुवर्ण रोखे विक्रीचे वेळापत्रक

टप्पा १ : २० एप्रिल ते २४ एप्रिल

टप्पा २ : ११ मे ते १५ मे

टप्पा ३ : ८ जून ते १२ जून

टप्पा ४ : ६ जुलै ते १० जुलै

टप्पा ५ : ३ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट

टप्पा ६ : ३१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर