सेन्सेक्स, निफ्टीत सलग तिसरी घसरण; व्यवहारांभ तेजी अल्पजीवी

मुंबई : सलग तिसऱ्या सत्रात घसरण नोंदवणाऱ्या भांडवली बाजारात बुधवारी बँक तसेच वित्त क्षेत्रातील समभाग विक्रीचा दबाव अधिक राहिला. जागतिक भांडवली बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर येथेही गुंतवणूकदारांनी नफावसुली साधत प्रमुख निर्देशांकांना आणखी खाली आणले.

सत्रात मंगळवारच्या तुलनेत ४०० अंशांची झेप नोंदवणारा सेन्सेक्स शेवटच्या तासाभरात घसरणीकडे निघाला. सत्रअखेर त्याने ६६.९५ अंश नुकसानासह ५२,४८२.७१ वर विराम घेतला. मुंबई निर्देशांकाने त्याचा ५२,५०० चा स्तरही सोडला. तर २६.९५ अंश घसरणीसह निफ्टी १५,७२१.५० पर्यंत स्थिरावला.

भांडवली बाजारात चालू सप्ताहारंभापासून निर्देशांक घसरण सुरू आहे. परिणामी, प्रमुख निर्देशांक हे त्यांच्या गेल्या आठवड्यात पोहोचलेल्या विक्रमी टप्प्यापासूनही आता अधिक दूर गेले आहेत.

सेन्सेक्समधील प्रमुख ३० कंपनी समभागांमध्ये पॉवरग्रिड सर्वाधिक, १.५१ टक्क्याने घसरला. तसेच बजाज फिनसव्र्ह, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी लिमिटेड, एनटीपीसी, हिंदुस्थान यूनिलिव्हर, बजाज फायनान्स, लार्सन अँड टुब्रो आदीही घसरले.

तुलनेत इन्फोसिस, रिलायन्स, नेस्ले इंडिया, मारुती सुझुकी, टेक महिंद्र, अल्ट्राटेक सिमेंट आदी मात्र १.१९ टक्क्यांपर्यंत वाढले.