मुंबई निर्देशांकात चार सत्रामध्ये २,३८२.१९ अंश आपटी; गुंतवणूकदारांची संपत्ती ८ लाख कोटींनी कमी

महिन्यातील वायदापूर्ती एक दिवसावर तर आगामी वर्षांचा अर्थसंकल्प चार दिवसांवर येऊन ठेपला असताना वरच्या टप्प्याला असलेल्या भांडवली बाजारात नफावसुलीचा दबाव बुधवारी शिगेला पोहोचला. विदेशी गुंतवणूकदारांच्या पुढाकाराने बाजारात वाढलेल्या विक्रीझोताने प्रमुख निर्देशांक एकाच व्यवहारात तब्बल २ टक्क्य़ांनी आपटले. परिणामी सेन्सेक्सने त्याचा ४७,५०० तर निफ्टीने लक्षणीय असा १४ हजाराचा स्तरही सोडला.

सुरुवातीपासूनच्या सत्रात घसरण अनुभवणारा मुंबई निर्देशांक सत्रात हजारहून अंशांनी आपटल्यानंतर दिवसअखेर सोमवारच्या तुलनेत तब्बल ९३७.६६ अंशांनी खाली येत ४७,४०९.९३ वर स्थिरावला. तर २७१.४० अंश आपटीसह राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १३,९६७.५० पर्यंत बंद झाला. भांडवली बाजारात सलग चौथा निर्देशांक सत्र ऱ्हास नोंदला गेला. तर या दरम्यान गुंतवणूकदारांची संपत्ती ८ लाख कोटी रुपयांनी कमी झाली.

गुरुवारी भांडवली बाजारात महिन्यातील वायदापूर्तीचे अखेरचे व्यवहार होणार आहेत. तर शुक्रवारच्या व्यवहारानंतर थेट सोमवारी, अर्थसंकल्प जाहीर होण्याच्या तारखेला सत्र होणार आहे. जागतिक बाजारातील घसरण, कंपन्यांचे संमिश्र तिमाही निकाल आणि गुंतवणूकदारांची नफावसुली यामुळे घसरण झाली.

मंगळवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त भांडवली बाजारात व्यवहार झाले नाहीत. सेन्सेक्सच्या ५०० हून अधिक अंशआपटीने चालू सप्ताहाची सुरुवात करणाऱ्या मुंबई शेअर बाजारात सोमवारी विदेशी गूंतवणूकदार संस्थांनी ७६५.३० कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली होती. बुधवारअखेर ८.०७ लाख कोटी रुपये ऱ्हासामुळे मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजारमूल्य १८९.६३ लाख कोटी रुपयांवर येऊन ठेपले.

सेन्सेक्समधील प्रमुख ३० कंपन्यांपैकी २४ कंपन्यांचे समभाग घसरणीत राहिले. तर ६ समभाग हे प्रमुख निर्देशांक आपटीनंतरही मूल्यतेजी नोंदविणारे ठरले. सर्वाधिक घसरण नोंदविणाऱ्या समभागांमध्ये अ‍ॅक्सिस बँक, टायटन कंपनी, इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक, डॉ. रेड्डीज्, एचडीएफसी लिमिटेड, एशियन पेंट्स यांचा ४ टक्क्य़ांपर्यंतच्या आपटीसह क्रम राहिला. तर टेक महिंद्र, आयटीसी, पॉवरग्रिड, अल्ट्राटेक, सिमेंट, एचसीएल टेक व नेस्ले इंडिया २.५७ टक्क्य़ांपर्यंत वाढले. १९ पैकी केवळ एक क्षेत्रीय निर्देशांक वाढला. सर्वाधिक घसरणफटका बँक, वित्त निर्देशांकांना बसला. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप एक टक्क्य़ाहून अधिक प्रमाणात घसरले.

सेन्सेक्स ४७,५०० खाली; तर निफ्टी १४ हजारानजीक

निर्देशांक आपटीला निमित्त..

गुरुवारी भांडवली बाजारात महिन्यातील वायदापूर्तीचे अखेरचे व्यवहार होणार आहेत. तर शुक्रवारच्या व्यवहारानंतर थेट सोमवारी, अर्थसंकल्प जाहीर होण्याच्या तारखेला सत्र होणार आहे. जागतिक बाजारातील घसरण, कंपन्यांचे संमिश्र तिमाही निकाल आणि गुंतवणूकदारांची नफावसुली यामुळे घसरण झाली.