मुंबई शेअर बाजाराच्या प्रमुख सेन्सेक्सने अखेर सत्रसमाप्तीला ५० हजारांचा टप्पा पार केलाच. गेल्या अनेक व्यवहारांपासून या मैलापासून फारकत घेणारा मुंबई निर्देशांक बुधवारी जवळपास ५०० अंश झेपसह प्रथमच ५० हजारांपुढे गेला.

आठवडय़ाच्या तिसऱ्या सत्रादरम्यान ५०,५२६.३० पर्यंत मजल मारणारा सेन्सेक्स दिवसअखेर मंगळवारच्या तुलनेत ४५८.०३ अंश वाढीसह ५०,२५५.७५ वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी सत्रादरम्यान १४,८६८.८५ वर झेपावल्यानंतर १४२.१० अंश वाढीने १४,७८९.९५ पर्यंत स्थिरावला. सत्र तुलनेत दोन्ही निर्देशांक जवळपास एक टक्क्याने वाढले.

केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदींचे गुंतवणूकदारांमार्फत होत असलेले स्वागत सलग तिसऱ्या दिवशी राहिले. विशेषत: विदेशी गुंतवणूकदारांनी बँक, वित्त, औषधनिर्माण क्षेत्रातील समभागांमधील खरेदीत रस दाखवला.

सेन्सेक्समध्ये इंडसइंड बँक सर्वाधिक, ७.६५ अंश वाढीसह तेजीत अग्रणी राहिला. त्याचबरोबर पॉवरग्रिड, डॉ. रेड्डीज्, सन फार्मा, एनटीपीसी, अ‍ॅक्सिस बँकही वाढले. तर तेजीच्या बाजारात अल्ट्राटेक सिमेंट, मारुती सुझुकी, आयटीसी, कोटक महिंद्र बँक, एशियन पेंटस, नेस्ले इंडिया, टीसीएस मात्र जवळपास एक टक्क्यापर्यंत घसरले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये बहुपयोगी वस्तू, आरोग्यनिगा, ऊर्जा, पोलाद, दूरसंचार, वित्त २.४७ टक्क्यांपर्यंत वाढले. तर स्थावर मालमत्ता निर्देशांक घसरला. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप १.४७ टक्क्यांपर्यंत वाढले.

तीन दिवसांत १२.३१ लाख कोटींची श्रीमंती

मुंबई शेअर बाजारातील गेल्या तीन व्यवहारातील निर्देशांक तेजीमुळे भांडवली बाजाराचे मूल्य १२.३१ लाख कोटी रुपयांनी वाढले. सूचिबद्ध कंपन्यांचे एकूण मूल्य १९८.४३ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. गेल्या तीन व्यवहारात मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३,९६९.९८ अंशांनी वाढला आहे. टक्केवारीत हे प्रमाण ८.५७ आहे.