22 January 2021

News Flash

सेन्सेक्सची गटांगळी

नव्या आठवडय़ाच्या सुरुवातीलाच ४० हजारांचा स्तर गाठणाऱ्या सेन्सेक्समधील सत्र घसरण १,६०० अंशांपर्यंतची राहिली.

(संग्रहित छायाचित्र)

देशाचा विकास दर अभूतपूर्व आक्रसण्याची भीती, सीमारेषेवर चीनकडून नव्या आगळीकीची जोड मिळाल्याने  भांडवली बाजाराचा सप्ताहारंभीच घसरणीने थरकाप उडल्याचे दिसून आले. वरच्या टप्प्यावर असलेल्या समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी नफेखोरी साधत सेन्सेक्स व निफ्टीला दोनटक्क्यांहून अधिकच्या फरकाने खाली आणले.

सोमवारी एकाच व्यवहारात ८३९.०२ अंश आपटीसह मुंबई निर्देशांक ३८,६२८.२९ वर, तर २६०.१० अंश गटांगळीने राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक ११,३८७.५० पर्यंत स्थिरावला.

नव्या आठवडय़ाच्या सुरुवातीलाच ४० हजारांचा स्तर गाठणाऱ्या सेन्सेक्समधील सत्र घसरण १,६०० अंशांपर्यंतची राहिली. डॉलरच्या तुलनेत भक्कम रुपयाऐवजी अन्य घडामोडींचाच अधिक विपरीत परिणाम बाजारात नोंदला गेला.

ऐतिहासिक किमान स्तर व उणे स्थितीतील पहिल्या तिमाहीतील सकल राष्ट्रीय उत्पादन सोमवारी सायंकाळी जाहीर होण्यापूर्वी, भारत-चीन सीमासंघर्षांची छाया बाजारात उमटली.

सोमवारची सेन्सेक्सची सुरुवातच ५०० हून अधिक अंशवाढीने होत मुंबई निर्देशांक ४० हजारांवर पोहोचला, मात्र त्यात घसरण होऊन मुंबई निर्देशांकात वेगवान उतार दिसू लागला. गुंतवणूकदारांच्या नफेखोरीने मुंबई निर्देशांकाने ४० हजारांचा स्तरही सोडला. उलट त्यात सत्रअखेर ८०० हून अधिक आपटी नोंदली गेली. सेन्सेक्स तसेच निफ्टी शुक्रवारच्या तुलनेत प्रत्येकी दोन टक्क्य़ांनी अधिक प्रमाणात आपटले.

मुंबई निर्देशांकात सन फार्मा सर्वाधिक, ७.३४ टक्क्य़ांसह आपटला. त्याचबरोबर स्टेट बँक, बजाज फिनसव्‍‌र्ह, बजाज फायनान्स, एनटीपीसी, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्र बँक, महिंद्र अँड महिंद्र, मारुती सुझुकी आदीही घसरले. फ्युच्युर समूह ताब्यात घेणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजचेही समभाग मूल्य १.७५ टक्क्य़ांपर्यंत घसरले.

मोठय़ा फरकातील निर्देशांक घसरणीतही ओएनजीसी आणि टीसीएस या दोन कंपन्या १.७४ टक्के वाढीसह तेजीच्या यादीत राहिल्या.

सर्व क्षेत्रीय निर्देशांक थेट ५ टक्क्य़ांपर्यंत आपटले. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप ४.३७ टक्क्य़ांपर्यंत घसरले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2020 12:14 am

Web Title: sensex and nifty are down more than two per cent abn 97
Next Stories
1 नवी मुंबई विमानतळ प्रकल्प आता अदानी समूहाकडे!
2 उद्यमशील, उद्य‘मी’ : विनियोगातील प्राधान्यक्रम
3 Corona Impact: अर्थव्यवस्थेच्या वाढीत तब्बल २४ टक्क्यांनी घट
Just Now!
X