लस, अपेक्षेपेक्षा सरस अर्थसुधाराने उत्साह

मुंबई : अपेक्षेपेक्षा अधिक मजबुतीने सुधारलेला विकास दर तसेच कोविड प्रतिबंधक लशीबाबतची प्रगती या आशेवर सप्ताहारंभीच भांडवली बाजारात उत्साहाचे वातावरण दिसून आले.  नव्या विक्रमापर्यंत झेपावला. विदेशी गुंतवणूकदारांकडून निधी ओघ कायम राहिल्यामुळे सेन्सेक्स व निफ्टीने मंगळवारी सार्वकालिक उच्चांकी स्तरावर झेप घेतली.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ५०५.७२ अंश वाढीने ४४,६५५.४४ या ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर पोहोचला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १४०.१० अंश वाढीसह १३,१०९.०५ वर स्थिरावला. दोन्ही निर्देशांकात शुक्रवारच्या तुलनेत एक टक्क्याहून अधिक भर पडली.

शुक्रवारी जाहीर झालेला पहिल्या तिमाहीच्या तुलनेत सुधारलेल्या विकास दराने गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवित झाल्या. भक्कम डॉलरमुळे बाजारात विदेशी गुंतवणूकदारांनीही समभाग खरेदी केली. कोविड-१९ प्रतिबंधक लशीबाबत प्रगतीच्या वृत्ताने बाजारात दिवसभर तेजीचे वातावरण राहिले.

परकीय चलन विनिमय मंचावरील डॉलरच्या तुलनेतील मंगळवारच्या एकाच व्यवहारातील तब्बल ३५ पैशांहून अधिकच्या वाढीचेही बाजाराच्या तेजीला बळ मिळाले. सलग तिसऱ्या महिन्यात अप्रत्यक्ष कर संकलन एक लाख कोटी रुपयांच्या पुढे राहिल्याची दखलही बाजाराने घेतली.

सेन्सेक्समध्ये सन फार्मा सर्वाधिक, ५.५१ टक्क्यांसह वाढला. तसेच इंडसइंड बँक, टेक महिंद्र, ओएनजीसी, भारती एअरटेल, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, बजाज ऑटोही वाढले. तर कोटक महिंद्र बँक, नेस्ले इंडिया, टायटन कंपनी, बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक, एनटीपीसी आदींमध्ये १.४० टक्क्यांपर्यंत घसरण झाली.

ग्राहकोपयोगी वस्तू वगळता मुंबई शेअर बाजारातील इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक तेजीच्या यादीत राहिले. त्यातही स्थावर मालमत्ता, दूरसंचार, माहिती तंत्रज्ञान आघाडीवर राहिले. मिड कॅप व स्मॉल कॅप प्रत्येकी एक टक्क्यापर्यंत वाढले.