गत ११ महिन्यांतील उच्चांक स्थापित करीत, सेन्सेक्स मंगळवारी २७,८०० पुढे गेला. तर सलग दुसऱ्या सत्रातील तेजीमुळे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८,५०० पल्याड गेला आहे. १८१.४५ अंश वाढीसह सेन्सेक्स २७,८०८.१४ वर, तर निफ्टीमध्ये ५३.१५ अंश भर पडून निर्देशांक ८,५२१.०५ अंशांवर दिवसअखेर स्थिरावला.
मंगळवारी सायंकाळी जाहीर होणाऱ्या मेमधील औद्योगिक उत्पादन व जूनच्या किरकोळ महागाई दराची प्रतीक्षा करत सत्रप्रारंभ करणाऱ्या गुंतवणूकदारांनी प्रमुख निर्देशांकांना त्यांच्या सोमवारच्या स्तरापुढे नेऊन ठेवले.
अमेरिकेतील भक्कम रोजगार वाढीच्या आकडेवारीवर येथील प्रमुख निर्देशांकांनी नव्या सप्ताहाचा प्रारंभ मोठय़ा तेजीसह केला होता. एकाच व्यवहारात तब्बल ५०० अंशांच्या वाढीने सेन्सेक्स ११ महिन्यांच्या उच्चांकावर विराजमान झाला होता. मंगळवारीदेखील असेच चित्र राहिले. परिणामी, व्यवहारात सेन्सेक्स २५,८२८ पर्यंत झेपावला. तर निफ्टी सत्रात ८,५२६.६० पर्यंत उंचावला.
टीसीएसच्या रूपात गुरुवारपासून सुरू होत असलेला कंपन्यांच्या पहिल्या तिमाहीचा निकाल हंगाम व वस्तू व सेवा कर विधेयकाची मंजुरी प्रतीक्षा असलेले पुढील आठवडय़ापासून सुरू होणारे पावसाळी अधिवेशन या पाश्र्वभूमीवर बाजारात गुंतवणूकदारांमध्ये खरेदीचे वातावरण होते.
सेन्सेक्समध्ये मूल्य वाढलेल्या १९ समभागांमध्ये आयसीआयसीआय बँक, टाटा स्टील, अ‍ॅक्सिस बँक, मारुती सुझुकी, एचडीएफसी, ओएनजीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज यांचा क्रम राहिला.
२.८७ टक्के वाढीसह पोलाद निर्देशांक क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये वरचढ ठरला. त्याचबरोबर स्थावर मालमत्ता, बँक, पायाभूत सेवा, ग्राहकोपयोगी वस्तू, वाहन, तेल व वायू तसेच भांडवली वस्तू निर्देशांक २ टक्क्यांपर्यंत वाढले. मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांकांमध्ये कमालीची तफावत होती. हे दोन्ही निर्देशांक अनुक्रमे ०.४९ व ०.०८ टक्क्यांनी वाढले.

क्वेस कॉर्पची बाजारात दमदार हजेरी!
प्रारंभिक खुल्या भागविक्री प्रक्रियेत तब्बल १४५ पट अधिक भरणा मिळविणारा प्रतिसाद लाभलेल्या क्वेस कॉर्पने मंगळवारी भांडवली बाजारात दमदार हजेरी लावली. थॉमस कूक समूहाचा भाग असलेल्या क्वेसने प्रत्येकी ३१७ रुपये किमतीला विकलेला समभाग बाजारात सूचिबद्धतेलाच ५८.६८ टक्क्य़ांच्या दमदार वाढीसह ५०३ रुपयांवर स्थिरावला. सत्रात तो ६०.४४ टक्क्यांनी वाढत ५०८.१० पर्यंत झेपावला होता.
क्वेस कॉर्पच्या माध्यमातून गेल्या नऊ वर्षांतील भांडवली बाजारात सर्वोत्तम सूचिबद्धता नोंदविली गेली आहे. चालू वर्षांत या आधी थायरोकेअर टेक्नॉलॉजीज (७३.४६ पट भरणा), टीमलीज सव्‍‌र्हिसेस (६६ पट भरणा) या समभागांची बाजारात दमदार पदार्पण केले आहे.
क्वेस कॉर्पने या भागविक्रीतून ४०० कोटी रुपये उभारले असून, बंगळुरूत मुख्यालय असलेल्या या कंपनीमार्फत २००७ पासून मनुष्यबळ व्यवस्थापन पाहिले जाते; तसेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उत्पादने पुरविली जातात.