सेन्सेक्स, निफ्टीची सातव्या सत्रात तेजी

मुंबई : दोलायमान निर्देशांक हालचालीनंतरही भांडवली बाजाराने बुधवारी विक्रमसफर कायम ठेवली. बँक, वित्त क्षेत्रातील समभागांच्या खरेदी जोरावर सेन्सेक्स व निफ्टीने सलग सहावी तेजी नोंदविली.

वरच्या टप्प्यावरील मूल्यामुळे बुधवारच्या सुरुवातीच्या सत्रात नफेखोरीचे धोरण अवलंबिणाऱ्या गुंतवणूकदारांनी व्यवहारअखेरच्या खरेदीमुळे मात्र दोन्ही निर्देशांकांना तेजी नोंदविण्यास भाग पाडले.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १३३.१४ अंश वाढीसह ४७,७४६.२२ वर प्रथमच पोहोचला. तर ४९.३५ अंश वाढीमुळे निफ्टीने १३,९८१.९५ हा स्तर पहिल्यांदा गाठला. दोन्ही निर्देशांक मंगळवारच्या तुलनेत प्रत्येकी पाव टक्क्याने वाढले.

अ‍ॅस्ट्राझेनेका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या कोविड-१९ लशीला ब्रिटनने मान्यता दिल्याचे सकारात्मक पडसाद आशियातील जवळपास सर्वच प्रमुख भांडवली बाजारात उमटले.

मुंबई निर्देशांकात गेल्या सलग सात व्यवहारातील तेजीदरम्यान जवळपास २,२०० अंश भर पडली आहे. बुधवारच्या व्यवहारात सेन्सेक्स व निफ्टी अनुक्रमे ४७,७४६.२२ व १३,९९७ पर्यंत पोहोचले होते.

सेन्सेक्समधील ३० कंपन्यांपैकी अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फायनान्स, मारुती सुझुकी, महिंद्र अँड महिंद्र, टेक महिंद्र, एशियन पेंट्स, हिंदुस्थान यूनिलिव्हर, कोटक महिंद्र बँक, टायटन कंपनी, नेस्ले इंडिया ४ टक्क्यांपर्यंत वाढले.

दोलायमान व्यवहारानंतरही इंडसइंड बँक, सन फार्मा, अ‍ॅक्सिस बँक, भारती एअरटेल, टीसीएस, स्टेट बँक, इन्फोसिसचे समभाग मूल्य मात्र १.६२ टक्क्यांपर्यंत घसरले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये वाहन, स्थावर मालमत्ता, पोलाद आदी १.६१ टक्क्यापर्यंत वाढले. तर दूरसंचार, माहिती तंत्रज्ञान निर्देशांकांनी घसरण नोंदविली. मिडकॅप व स्मॉलकॅप प्रत्येकी जवळपास अर्ध्या टक्क्यापर्यंत खाली आले.

रुपया भक्कम

परकीय चलन विनिमय मंचावर डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य बुधवारी ११ पैशांनी झेपावत ७३.३१ या गेल्या दोन महिन्यांच्या वरच्या टप्प्यावर पोहोचले. भांडवली बाजारात विदेशी गुंतवणूकदारांची निधी ओघ कायम असल्याची ही परिणती ठरली. बुधवारच्या ७३.३५ पासून सुरू झालेल्या रुपयाचे व्यवहार सत्रात ७३.२६ पर्यंत उंचावले. तर ७३.३६ हा त्याचा सत्रतळ राहिला. त्याचा दिवसअखेरचा विराम १३ ऑक्टोबरनंतरचा वरचा ठरला. स्थानिक चलनात गेल्या पाच व्यवहारांपासून तेजी आहे. या दरम्यान रुपया ५३ पैशांनी भक्कम झाला आहे.